Nigdi : ऑनलाईन शॉपिंग पडलं महागात; 36 हजारांचा मागवला कॅमेरा अन् आली वीट

एमपीसी न्यूज – निगडी येथे राहणा-या एका तरुणाने ऍमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून 36 हजार 495 रुपये किमतीचा कॅनॉन कंपनीचा एक डीएसएलआर कॅमेरा मागवला. ऑर्डर करतेवेळी त्याचे पैसे त्यांनी ऑनलाईन माध्यमातून जमा केले. ऑर्डर दिल्यानंतर चार दिवसात कंपनीकडून एक पार्सल त्यांना मिळाले. त्यामध्ये कॅमेरा नसून चक्क एक वीट आणि काही दगड होते. हा प्रकार 6 जून रोजी निगडी प्राधिकरण येथे घडला. याबाबत ऍमेझॉन कंपनीने हात वर केले असून यात कंपनीची काहीही चूक नसल्याचे कंपनी सांगत आहे. तरुणाला मात्र कॅमे-या ऐवजी 36 हजार 495 रुपयांची एक वीट आणि काही दगड आले आहेत.

सौरभ नाईक प्राधिकरण येथील सेक्टर नंबर 25 येथे राहतात. त्यांना येत्या आठवड्यात बाहेरगावी जायचे आहे. त्यासाठी त्यांनी कॅमेरा मागवायचे ठरवले. सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड असल्यामुळे तसेच ते स्वतः देखील मागील काही वर्षांपासून अनेक वस्तू ऑनलाईन शॉपिंग साईटच्या माध्यमातून मागवतात. त्यामुळे amazon.in  या शॉपिंग साईटवरून त्यांनी Canan EOS 1500 D (डीएसएलआर) हा कॅमेरा ऑर्डर केला. या कॅमे-याची किंमत 36 हजार 495 रुपये आहे. कॅमे-याची सर्व रक्कम त्यांनी डिलिव्हरी होण्यापूर्वीच ऑनलाईन माध्यमातून जमा केली.

2 जून रोजी त्यांनी ऑर्डर दिली. ऍमेझॉन कंपनीचा त्यांना मेसेज आला. त्यामध्ये त्यांना त्यांनी मागवलेला कॅमेरा 6 जून रोजी मिळणार असल्याचे सांगितले. 6 जून रोजी अभिषेक काटे नावाचा डिलिव्हरी बॉय सौरभ यांनी मागवलेल्या कॅमे-याचे पार्सल घेऊन आला. त्याने पार्सल दिले. ओटीपी घेतला आणि निघून गेला. सौरभ यांनी पार्सल घरात आणले. घरातील सर्वांच्या उपस्थितीत पार्सल फोडले. त्यामध्ये कॅमेरा ठेवण्याची बॅग काही कागदे आणि वीट व दगड आढळून आली. सौरभ यांना कॅमे-याऐवजी 36 हजार रुपयांची चक्क वीट मिळाली आहे.

याबाबत त्यांनी तात्काळ निगडी पोलिसात धाव घेतली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांची भेट घेतली. त्यांना याबाबत तक्रार अर्ज दिला.

नाईक यांनी याबाबत ऍमेझॉन कंपनीला मेल केला. त्यात म्हटले की, मी कॅनॉन कंपनीचा 1500 डी(डीएसएलआर) हा कॅमेरा ऍमेझॉन शॉपिंग साईट वरून मागवला. त्या ऑर्डरमध्ये मला कॅमेरा बॅग, काही कागदपत्र, विटा आणि दगडे मिळाली. या फसवणुकीचा योग्य तपास करून पैसे अथवा कॅमेरा मला द्यावा.” त्यावर ऍमेझॉनकडून सांगण्यात आले, “ऑर्डर करताना दिलेल्या पत्त्यावर आम्ही प्रॉडक्ट पोहोचवला आहे. यामध्ये ऍमेझॉन कंपनीची कोणतीही चूक नाही. आपणास कोणत्याही प्रकारचा रिफंड अथवा कॅमेरा (प्रॉडक्ट) मिळणार नाही.”

नाईक यांनी ऍमेझॉन ट्विटरवर मेसेज केला की, “मी जो प्रॉडक्ट मागवला. तो प्रॉडक्ट आला नसून त्याजागी मला वीट आणि दगड मिळाले आहेत. याबाबत आपण सहकार्य करावे.” यावर ऍमेझॉन ट्विटरकडून उत्तर मिळाले की, “आपण मागवलेल्या प्रॉडक्टच्या ऑर्डरचा संपूर्ण तपशील पाहून शक्य तेवढ्या लवकर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल”

एवढा सर्व आटापिटा करून शेवटी सौरभ यांनी त्याच कंपनीचा (Canan EOS 1500 D) डीएसएलआर दुसरा कॅमेरा विकत घेतला. मात्र यावेळी त्यांनी प्रत्यक्ष दुकानातून कॅमेरा विकत घेतला आहे. ऍमेझॉन कंपनीकडून फसवणूक झाली आहे. त्यांना कॅमे-याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन साईटवरून मागवला होता. मात्र त्यांना तिथे कॅमेरा नाही तर मनस्ताप मिळाला आहे. याबाबत ते योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे सौरभ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.