Nigdi : गणेश तलावातील गाळ काढणार; महापालिका उद्यानात ‘ओपन’ जीम उभारणार

महापौर राहुल जाधव यांची माहिती 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढणे आवश्यक आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्यकतेनुसार ‘ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या उद्याने, आरक्षणांसह मिळकतींचा महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवार)पासून पाहणी दौरा केला आहे. त्यानुसार आज  ‘अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या गणेश तलाव, उद्याने, व्यायमशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे आणि जलतरण तलावाची त्यांनी पाहणी केली. माजी उपमहापौर शैलजा मोरे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक अमित गावडे, केशव घोळवे, नगरसेविका वैशाली काळभोर, मीनल यादव, शर्मिला बाबर, कार्यकारी अभियंता  मनोज शेठिया, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, उद्यान अधिक्षक डी.एन.गायकवाड यावेळी उपस्थित होते

महापौर जाधव म्हणाले, महापालिकेचे प्राधिकरणातील गणेश तलाव आणि उद्यान अतिशय उत्कृष्टरित्या विकसित केले आहे.  अनेक नागरिक सकाळी या ठिकाणी वॉकिंगसाठी येतात. त्यांना कोणतीही अडचण येवू नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. उद्यानात आणखीन सुविधा दिल्या जाणार आहेत. गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. संबंधितांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सर्व उद्यानात आवश्यकतेनुसार ‘ओपन’ जीम उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मदनलाल धिंग्रा मैदान व कै.सदाशिव बहिरवाडे मैदानाच्या सीमाभिंतीची उंची वाढवून त्यावर जाळी बसविणे. सीमाभिंतीला तडे गेल्याने त्याची दुरूस्ती करणे. किंवा नव्याने बांधावी. मैदानावर स्प्रींकलरकामी जादा गेजची पाईपलाईन टाकणे. बॅडमिंटन कोर्टवर सिंथेटीक मॅट बसविणे. नादुरूस्त बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. प्राधिकरण, मोहननगर येथील कंपाऊंटच्या जाळ्या नव्याने बसविण्यात याव्यात. उंचवटा काढून स्लोप देणे.  गणेश तलाव लॉन टेनिस कोर्ट व स्केटींग मैदान भाड्याने देणेबाबत तातडीने कार्यवाही करणे.

जाळीवर असलेली हिरव्या रंगाची नेट जाळी बसविणे. टेनिस कोर्टवर पाणी साचत असल्याने मैदानाची लेव्हल करणे. मैदानावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. कुस्तीचा आखाडा तयार करणे. शिवाजी महाराज जलतरण तलाव, मोहननगर जलतरण तलाव व संभाजीनगर जलतरण तलावाची खोली कमी करावी. फुटलेल्या फरशा दुरूस्त करण्यात याव्यात. लहान मुलांच्या जलतरण तलावाची खोली कमी करावी. गळती रोखावी, सिंथॅटिक ट्रॅक तयार करावेत, फिल्टरेशनचे साहित्य व मशिन पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना महापौर जाधव यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.