Nigdi : चोरीचा हस्तगत केलेला साडेसतरा लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

पोलीस रेजिंग डे निमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकवणे, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्यातील पाच पोलीस ठाण्यातील साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस रेजिंग डे निमित्त या कार्यक्रमाचे निगडी पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव उपस्थित होते.

निगडी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरीला गेलेल्या 56 सायकल पकडल्या आहेत. त्यातील 22 सायकलच्या मूळ मालकांचा शोध लागला असून त्यांना सायकल परत करण्यात आल्या. तसेच एक मोटारसायकल आणि सात मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 73 हजार 989 रुपयांचा ऐवज देण्यात आला. आळंदी पोलिसांनी तीन मोटारसायकल आणि तीन घरफोड्यांमधील एकूण 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला. भोसरी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीच्या चार गुन्ह्यातील 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल मूळ मालकांना देण्यात आल्या. त्याचबरोबर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन मोटारसायकल, एक मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने असा 73 हजार रुपयांचा ऐवज मूळ मालकांना दिला. पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 45 हजारांचा ऐवज मूळ मालकांना परत देण्यात आला. अशा प्रकारे पाच पोलीस ठाण्यातील एकूण 17 लाख 47 हजार 789 रुपयांचा ऐवज मूळ मालकांना देण्यात आला.

अप्पर आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. आयुक्तालयासाठी मंजूर मनुष्यबळाच्या निम्मे मनुष्यबळ सध्या शहरात कार्यरत आहे. त्यामुळे पोलिसांना काही अडचणी येत आहेत. मात्र याचा नागरिकांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ न देता पोलीस काम करत आहेत. शहरात गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. गुन्हेगारीमुक्त शहर करण्यासाठी पोलिसांचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नागरिकांना येणा-या अडचणी त्यांनी पोलिसांसमोर मांडाव्यात, त्यांना पोलिसांकडून आवश्यक ती मदत केली जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.