Nigdi : संचारबंदीत ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या 10 जणांवर पोलिसांकडून स्मार्ट कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी असताना काही अतिउत्साही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात. अशा अतिउत्साही 10 जणांवर निगडी पोलिसांनी स्मार्ट कारवाई केली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याबद्दल काही उपहासात्मक फलक नागरिकांच्या हाती देऊन पोलिसांनी त्यांचे फोटोसेशन देखील केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन आणि पोलीस तसेच वैद्यकीय यंत्रणा यांची तारेवरची कसरत सुरू आहे. या कालावधीत नागरिकांना केवळ घरात बसून प्रशासनाला आणि पर्यायाने स्वतःला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. तरीही काही अतिउत्साही नागरिक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी समजावून सांगितले, बजावून सांगितले, काठीचा प्रसाद देऊन सांगितले, प्रसंगी कारवाई आणि गुन्हे दाखल करूनही सांगितले. पण नागरिकांवर पोलिसांच्या कोणत्याही अस्त्राचा परिणाम पडत नाही.

शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188, साथरोग प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना 2020, आपत्ती व्यवस्थापन कायदा अशा विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. पण नागरिकांचा मूड काही निराळाच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता नागरिकांच्या मूडनुसार आपली कारवाईची पद्धत बदलली आहे.

निगडी प्राधिकरण परिसरात आज, शुक्रवारी (दि. 17) भल्या सकाळी 10 नागरिक आपल्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले. काहीजण आपल्या श्वानांचा पाय मोकळा व्हावा म्हणून त्यांनाही घेऊन आले. त्यात हद्द म्हणजे काही जणांनी आपल्या चेहऱ्यावर साधा रुमालही बांधला नव्हता. निगडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली आणि पोलिसांनी लगेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या बहद्दरांकडे धाव घेतली.

‘मी गाढव आहे. मला सांगितलेले कळत नाही’, ‘मी स्वार्थी आहे. कोरोना फैलावण्यास मदत करीत आहे’, ‘मी अतिशहाणा आहे. मॉर्निंग वॉकला चाललो आहे’, ‘मी आदेश पाळत नाही. कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे’, ‘मी कोरोनाने मरणार आणि इतरांनाही मारणार, ‘my morning walks keeps me feet, even if I risk making others UNFIT’, ‘I am an educated citizen of India, but I do not follow government orders’. पोलिसांनी अशा आशयाचे बोर्ड मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांच्या हातात देऊन त्यांचे फोटोसेशन केले. या उपायाने तरी नागरिकांना शहाणपण येईल अशीच आशा आता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.