Nigdi : सन्मानाचा गर्व करु नये, तर अपमानातून खचू नये – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज

एमपीसी न्यूज – मानवी जीवन दुर्लभ आहे, त्यामुळे जीवनात नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच यश, मान, सन्मान, संपत्ती मिळेल. मिळालेल्या संपत्तीचा गर्व करु नये, त्या संपत्तीतून घरात सुख, शांती, समाधान आले पाहिजे. त्याबरोबर गर्व, मद, मत्सर येता कामा नये. मनाच्या विरुध्द काही घडले तर असमाधानी होऊ नये. जीवनात सन्मान आणि अपमान अनेकदा मिळेल. परंतू सन्मानाचा गर्व करु नये, तर अपमानातून खचू नये. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास निमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज म्हणाल्या की, जेथे रात्र आहे, तेथे दिवस होणारच आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला प्रसन्नतेने, साहसाने सामोरे जावे. मानसाचे मन चंचल असते, त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तप, साधना, ध्यान, धारणा आवश्यक आहे. जैन धर्मात तपाला, अंहिसेला महत्व आहे. स्वत:ची हौस भागविण्यासाठी फुल उमलण्याआधीच कळी तोडणे देखील हिंसा आहे. फॅशनच्या नावाखाली रेशमी वस्त्रांचा वापर केला जातो. मिटरभर रेशमी कापडासाठी शेकडो रेशीम किड्यांची हिंसा केली जाते. फॅशनेबल बॅग, पाकीट, पर्स, चपला, सॅंन्डलसाठी प्राणीमात्रांची हत्या केली जाते. हे निंदनीय असून मानवाला शोभा देणारे नाही. असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.