Nigdi : ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या नामघोषात निघाली इस्कॉनची श्री जगन्नाथ रथयात्रा

एमपीसी न्यूज – ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या नामघोषात शनिवारी (दि. 23) इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

श्री जगन्नाथ रथयात्रेला दत्तमंदिर यमुनानगर येथुन सुरुवात झाली. यावेळी राधा गोपीनाथ प्रभु, श्री भगवान प्रभु यांच्या उपस्थितीत रावेत श्री गोविंद धाम इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोपती दास, श्रीमान रोहिणीकुमार प्रभु, राधा प्रसाद दास, माजी उपमहापौर शैलजा मोरे, मोरेश्वर शेडगे, बिभिषण चौधरी, माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, दुर्गा मंदिराचे प्रमुख शैलेश कंद आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी श्री भगवान प्रभु यांच्या हस्ते जगन्नाथांची आरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांनी रथ ओढत रथयात्रेला सुरुवात केली. यावेळी रथयात्रेच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ही रथयात्रा यमुनानगर दत्तमंदिरापासून निगडीतील मधुकर पवळे पूल, महाराष्ट्र बँक, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पूल, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने जात इस्कॉन श्री गोविंद धाम मंदिर येथे समाप्त करण्यात आली.

यावेळी राधा गोपीनाथ प्रभु म्हणाले की, जगन्नाथपुरी येथून ज्याप्रमाणे रथयात्रा काढली जाते, त्याप्रमाणेच रावेत श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिराच्या वतीने शहरात रथयात्रा काढली जाते. प्रत्येक भाविकाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाला भगवंताचे दर्शन व्हावे, या उद्देशाने या रथयात्रेचे आयोजन केले जाते. हे रथयात्रेचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन भगवंतांच्या दर्शनाचा लाभ घेतात.

या महोत्सवाच्या अंतर्गत रावेत श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिरात सकाळी 8 वाजता मंगल होम यज्ञ, त्यानंतर सायंकाळी भजन, सायंकाळी सात वाजता नाटिका, सायंकाळी साडेसात वाजता जगन्नाथ कथा, रात्री साडेआठ वाजता विशेष दर्शन आणि आरती, रात्री 9 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. राधा गोपीनाथ प्रभु यांनी भक्तांना जगन्नाथ कथा सांगितली. तसेच रथयात्रेनंतर श्रीगोविंद धाम इस्कॉन मंदिरामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.