Nigdi : आयुष्यात चांगले काम करा पुण्य मिळेल – पूलक सागर महाराज

एमपीसी न्यूज- स्वभावाला औषध नाही हे खरं असल तरी दुस-याचं अहित करायच कारणच नसेल तर विचारात, बोलण्यात, कृतीत नेहमी सरलता राहील. आयुष्यात चांगले काम करा. पुण्य मिळेल. कोणालाही छळू नका, जसे कराल तसे भराल हा संदेश आजच्या उत्तम आर्जव या तिस-या दिवशीच्या प्रवचनांतून पूलकसागर महाराज यांनी निगडी येथे दिला.

निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने दशलक्षण पर्व महोत्सवास प्रारंभ झाला. त्याच्या तिसऱ्या दिवशीच्या मार्गर्शनात उत्तम आर्जव यावर बोलत होते. यावेळी पर्युषण पर्वाचे विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी झाले. यावेळी भगवान महावीर यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, उपाध्यक्ष मिलिंद फंडे, अजित पाटील, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे आदी उपस्थित होते.

पूलक सागर महाराज म्हणाले की, आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, कोठेही कपट मनात नसते, मायाचार न करणे. आत्मोन्नतीसाठी व्रत करणा-यांनीच नव्हे तर या उत्सवात भाग घेणा-या सर्व स्त्री-पुरुषांनी अंशत: तरी दशधर्माचे गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व जीव समान असल्यामुळे कोणालाही तुच्छ न मानता सर्वांबरोबर प्रेमळपणाने वागावे. कपटाचरण सोडून नेहमी सदवृत्तीने वागावे. न्यायबुद्धी ठेवून शक्तीनुसार निरनिराळ्या सत्कार्यात दानधर्म करावा. एकंदरीत दशधर्म पालनास योग्य असे आचरण ठेवल्यानंतर आत्मोन्नती होऊन इहपरलोकी सुख मिळविल्याशिवाय राहणार नाही.

महाराजांचा आशीर्वाद हीच प्रेमाची सावली – श्रीनिवास पाटील

दशलक्षण पर्व महोत्सवाच्या तिस-या दिवशी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते. त्यांचा सकल वर्षंयोग समिती उपाध्यक्ष अजित पाटील, जितेंद्र शहा, मिलिंद फडे, सुनील खोत आणि अरविंद जैन यांच्या हस्ते चांदीचा कलश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील बोलत होते.

“लहानपणापासून जैन समाजाचे मित्र आहेत. त्यामुळे जैन समाजाच्या रूढी, परंपरा मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. जैन समाजाबद्दल मला आस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संक्रातीच्या दिवशी माझ्या घरी आले होते. त्यावेळी ते मराठी भाषेतून माझ्याशी बोलले. ते म्हणाले “तिळगुळ घ्या, गोड बोला.” त्यांचा अन्य भाषेबाबतचा आदर पाहून मी भारावून गेलो आणि त्यांच्याशी त्यावेळी गुजराती भाषेतून वार्तालाप केला. पूर्वी प्राधिकरणाचा भाग अतिशय मागास होता. मी प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. तेंव्हापासून लहान-मोठ्या बदलाला सुरुवात झाली. मी अध्यक्ष असताना 186 एकर जमीन टाटा मोटर्स या कंपनीला दिली. त्यानंतर विविध कंपन्या या भागात वसल्या. प्राधिकरणातील विविध वसाहतींना व भागांना नद्यांची नावे आहेत. ही संकल्पना पूर्णपणे माझी आहे”

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी देखील दशलक्षण पर्व महोत्सवाला भेट देऊन पूलक सागर महाराज यांचे दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.