Nigdi: नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून प्राधिकरणातील कचरा केंद्र हटवावे

अमित गोरखे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन ही प्रशासकीय वापरासाठी आवश्यक इमारत आहे. त्या भवना जवळील मोकळी जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा वाहतूक केंद्र केले आहे. त्याला या भागातील रहिवाशी नागरिकांचा विरोध असून वारंवार त्या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. तरी, नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून महापालिका प्रशासनाने ताततडीने हे कचरा केंद्र स्थलांतरित करावे, अशी मागणी भाजप प्रदेश सदस्य तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणाचा परिसर अत्यंत सुव्यवस्थित आणि स्वच्छ मानला जातो. परंतु, निगडी प्राधिकरणातील मोकळया जागेवर महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीच्या भरलेल्या गाड्या उभ्या केल्या जातात.

  • महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने ठेकेदार अनधिकृतपणे या केंद्राचा वापर करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. महानगरपालिकेने या जागेवर जिल्हा मध्यवर्ती केंद्र बांधण्यास मंजूरी दिलेली आहे. त्या परिसरातील नागरीकांना पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्या जागेला लागूनच खेळाची मैदाने महानगरपालिकेने विकसित केली आहे.

कच-याच्या गाड्या रात्रंदिवस तेथे उभ्या असल्यामुळे मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरत असून त्या मैदानावर अस्वच्छतेमुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे रोग पसरले आहेत. शौचालयाच्या फिरत्या गाड्यांचे पार्किंग सुध्दा तेथे केले जाते. पावसाळयात हा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे. गाड्यांबरोबर तेथील भंगार मालामुळे पाणी साचून डेंग्यू, मलेरियासारखे आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.

  • या जागेला लागून लॉन टेनीस स्पोर्टस् असल्यामुळे खेळाडूंना त्रास होत आहे. या विषयीची तक्रार वेळोवेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी जागेची पाहणी केली, परंतु अद्याप या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे कचरा केंद्र स्थलांतरित करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबधितांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.