Nigdi : काश्मीरच्या विविध समस्या आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापक मोहिम महत्वाची – सचिन ढोबळे

एमपीसी न्यूज -काश्मीर म्हणजे भारताच्या डोक्यावरची भळभळती जखम. गेली तीन दशके पृथ्वीवरील या नंदनवनाचा दहशतवाद्यांनी अक्षरश: नरक बनवला आहे. काश्मीरच्या विविध समस्या आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापक मोहीम गरजेची आहे हे वास्तव आहे, असे मत इतिहासाचे अभ्यासक सचिन नथुराम ढोबळे यांनी निगडी येथे व्यक्त केले. 

निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प काश्मीर – धगधगते यज्ञकुंड या विषयावर गुंफले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विनोद बन्सल, इंद्रायणी बॅंकेचे अध्यक्ष मनोज आगरवाल, हभप किसनमहाराज चौधरी, भास्कर रिकामे, नरहरी वाघ आदी उपस्थित होते.

सचिन ढोबळे पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, असे आपले राजकीय नेते ठासून सांगत असतात. सीमावर्ती भागात असलेला काश्मीर हे नंदनवन समजले जाते. मात्र गेली तीन दशके या नंदनवनाचा दहशतवाद्यांनी अक्षरश: नरक बनवला आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर काश्मीर घशात घालण्यासाठी पाकिस्तानने तीन युद्धे लादली. १९८० नंतर छुपी युद्धे भारतावर लादण्यास सुरुवात केली. काश्मीरच्या विविध समस्या आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापक मोहीम गरजेची आहे.

जगात दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जातो. यात हेलिकॉप्टर, रॉकेट लॉँचर, दारुगोळा यांचा मुक्त वापर केला जातो. मात्र काश्मीरमध्ये लष्कर पोलिसी कारवाईहून अधिक काही करत नाहीत. यामुळे सात हजाराहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.काश्मीरमधील दहशतवाद निश्चितपणे आटोक्यात आणला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लष्करी कारवाईबरोबरच लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. छुपे युद्ध हाताळणे ही दीर्घ प्रक्रिया असते. त्यासाठी आपण छुपे युद्ध, पारंपरिक युद्ध आणि आण्विक पार्श्वभूमी यांचा विचार करून सगळ्या प्रकारच्या युद्धाची तयारी आपण ठेवायला हवी. पाकिस्तानला आपण छुप्या युद्धात वर्चस्व मोडून काढायला देता कामा नये. तसेच पाकिस्तानला स्वत:च्याच औषधाची चव चाखायला लावली पाहिजे. सिंध, बलुचिस्तान, एनडब्ल्यू. एफ. पी. हे पाकिस्तानातील प्रांत गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. तेथे पैसा पुरवून काहीही केले जाऊ शकते.  पाकिस्तानी सैनिकांचे प्राण जायला लागल्यानंतर तर जम्मू-काश्मीरमध्ये छुप्या युद्धाची पूर्वतयारी करणा-या दहशतवाद्यांना आधार देणे पाकिस्तानला थांबवावे लागेल. तसेच भारताने इस्लामी देशांशी संबंध प्रस्थापित करून पाकिस्तानला एकटे पाडायला हवे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास देशपांडे यांनी केले. परिचय उज्वला केळकर यांनी केला. तर आभार भास्कर रिकामे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.