Nigdi : संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा विचार रुजवला -ह.भ.प. किसनमहाराज चौधरी

एमपीसी  न्यूज – समता, एकता, प्रेम आणि बंधुता हा विचार वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी समाजात रुजवला असे मत ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी निगडी  येथे व्यक्त केले.

विठ्ठल रुक्मिणी प्रेरणा मंडळ आयोजित ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रवचन सोहळ्यात निरूपण करताना ह.भ.प. किसनमहाराज चौधरी बोलत होते. सुमारे चौदा वर्षांपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माउली उद्यान, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे आयोजन करण्यात येते. या वर्षी किसनमहाराज चौधरी यांच्या अधिपत्याखाली सुमारे सव्वाशे भाविक पारायण सोहळ्यात सहभागी झाले होते. या प्रसंगी यशवंत लिमये यांच्या अधिपत्याखाली विनोबा भावे लिखित ‘गीताई’चे सामुदायिक वाचन करण्यात आले. पारायण सोहळ्यात सहभागी भाविकांना श्रीफळ, प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ह.भ.प. किसनमहाराज चौधरी म्हणाले की, “मूळ संस्कृत भाषेतील सातशे श्र्लोकांच्या गीतेचे संत ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्यांमध्ये टीकात्मक निरूपण करून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ सिद्ध केला. अध्यात्माचे एकांती असलेले ज्ञान त्यांनी लोकांती केले. ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा विषय आहे म्हणून संत नामदेव म्हणतात की,  “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी ||” पारायण आणि प्रवचन सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष विजयदत्त निमक, कार्याध्यक्ष भानुदास सोनगिरे, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव अनघा कोत्तूर, सदस्य मधुसूदन मोकाशी आणि प्रवीण सोनार यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.