Nigdi : मांडूळ तस्करी प्रकरणी चौघांना अटक; 15 लाखांचे मांडूळ जप्त

एमपीसी न्यूज – मांडूळ तस्करी करणाऱ्या चौघांना निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास भक्ती शक्ती चौकात ट्रान्सपोर्ट नगरकडे जाणा-या रोडवर करण्यात आली.

सैफ रौफ शेख (वय 23, रा. जुना मुंढवा रोड, गणेश नगर, वडगाव शेरी), प्रमोद सुनील पाटील (वय 21, रा. खराडी, पुणे), दिनेश विजय नायर (वय 27, रा. टिंगरेनगर, अक्षय अपार्टमेंट, येरवडा), अमर रामदास उदमले (वय 31, रा. शेंदाणे चाळ, दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मांडूळ घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा रचून चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या एका बॅगमध्ये चॉकलेटी रंगाचे एक मांडूळ आढळून आले. हे मांडूळ 50 इंच लांब, 9 इंच गोलाई आणि तीन किलो वजनाचे आहे. पोलिसांनी आरोपीकडून 15 लाख रुपये किमतीचे मांडूळ प्रजातीचे साप जप्त केले आहे. आरोपींवर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल एल सोनवणे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निकाळजे (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल एल सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मछिंद्र घनवट, संदीप पाटील, विलास केकाण, सतीश ढोले, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.