Nigdi: शालेय शिक्षण हे दबावमुक्त हवे – मनोज देवळेकर

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे नवनियुक्त केंद्र प्रमुख मनोजराव देवळेकर यांची ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांनी घेतलेली विशेष मुलाखत Nigdi: School education should be free from pressure - Manoj Devalekar

एमपीसी न्यूज (राजन वडके) – शैक्षणिक क्षेत्रांत अनेक प्रश्न असून, गेल्या २० वर्षांत शिक्षणाचा `उद्योग` झाला आहे. शिक्षणावरील प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. शालेय शिक्षण हे दबावमुक्त झाले पाहिजे, असे आग्रही मत ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी व्यक्त केले.

ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीशराव बापट यांनी शाळेच्या वर्षारंभदिनी 22 जून रोजी देवळेकर यांची केंद्रप्रमुख नियुक्ती जाहीर केली. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन पद्दतीने झालेल्या या कार्यक्रमास मावळते केंद्र प्रमुख वामनराव तथा भाऊ अभ्यंकर तसेच शिक्षक उपस्थित होते. या नियुक्तीनंतर या प्रतिनिधीशी बोलताना देवळेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती होत असल्याबाबत देवळेकर यांनी लॉकडाऊन बरोबरच शैक्षणिक क्षेत्रावरील आव्हानावर भाष्य केले. त्याचबरोबर शालेय व क्रीडाकुलच्या नवीन योजनांची माहिती देत पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

शालेय शिक्षण क्षेत्रावरील समाजातील प्रभाव आणि दबावाबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी चांगल्या शिक्षणासाठी चांगले राजकीय नेते तसेच उद्योजकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या अर्थकारणात शासनाने लक्ष घातले पाहिजे. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या विचारांनी स्वायत्त व मोकळेपणाने काम करू दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे यंदा वर्षभर नियमित शाळा भरवता येणार नाही असे वाटते, असे सांगून देवळेकर म्हणाले,  त्या प्रमाणे योजना करून आम्ही तीन प्रकारे शिक्षण देण्याच्या व्यवस्था केली आहे. त्यात ऑनलाइन लर्निंग, ऑफलाइन लर्निंग आणि तिसरं कृतीयुक्त शिक्षण यांचा समावेश आहे. यासाठी शाळेतील अडीच हजार मुलांचा डेटा तयार आहे.

ऑफलाइन शिक्षणासाठी मुलांना व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून पीडीएफ किंवा पीपीटीच्या माध्यामातून शिक्षण दिले जाईल. शासनाकडून आलेली पुस्तके त्यांना दिली आहेत. पीडीएफ पुस्तके कशी उपलब्ध होतील याचीही माहिती दिली आहे. एकूणच मुलांना घरातच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कृतीयुक्त शिक्षणात मुलांना आम्ही घरातच प्रयोग करा, त्यातून तुम्हीच अनुमान काढा यासाठी प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. याचे मोजमाप नसले तरी मुलांचे शिक्षण सुरू राहील, अशी तीन महिन्यांसाठी योजना तयार आहे. 15 जूनपासून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

क्रीडाकुलबाबत बोलताना ते म्हणाले, क्रीडाकुल हा शालेय स्तरावरील आमचा यशस्वी प्रकल्प आहे. तो अमूलाग्र आहे हे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. कारण आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे तसेच अनेक शास्त्रांचे एकत्रिकरण करणे आणि त्यासाठी भारतात तज्ज्ञ एकत्रित येणे हे आव्हान आहे. ते आम्ही करू शकलो आहोत.

भावीकाळात 25 ते 30 एकरावर नवीन क्रीडासंकुल उभारण्याचा मानस आहे. त्यात 18 वर्षापुढील मुलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवायचे आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या क्रीडा प्रशिक्षणाची मांडणी आत्मनिर्मभर आहे. यासाठी 40 कोटींची योजना तयार असून, प्रकल्प कार्यान्वित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्यवेधी विचार करायचा असतो हे प्रबोधिनीत कायम सांगितले जाते. त्यामुळे लॉकडाऊनमुळे काय होणार, याचा विचार आम्ही लगेचच

सुरू केला होता. आमची टीम तंत्रज्ञानात पारंगत असल्याने. संवाद खंडित झाला नाही. तशी आखणी करून मुले घरी असताना त्यांच्यासाठी खूप उपक्रम घेतले. ऑनलाइन पद्दतीने अभ्यास पूर्ण केला. सुटीत मुले घरात असातना कुटुंबात शिकू शकतील असे विविध 39 उपक्रम 10 मेपर्यंत चालवले, अशी माहिती देवळेकर यांनी लॉकडाऊनच्या आव्हानाबाबत बोलताना दिली.

 
‘केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी ही अभिमानाची गोष्ट’

 

केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. अप्पासाहेब पेंडसे, विद्यमान संचालक डॉ. गिरीशराव बापट आणि वामनराव अभ्यंकर यांच्याबाबत भावना व्यक्त करताना देवळेकर काहीसे भावूक झाले. ते म्हणाले, ही जबाबदारी घेणं किंवा याचा भाग होणं ही आनंदाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे. तसेच ते भाग्याचे यासाठी वाटते की आदरणीय अप्पासाहेब, माननीय गिरीशराव आणि भाऊ या तिघांचाही सहवास किंवा मार्गदर्शन शालेय जीवनापासूनच मला मिळालयं. समाजाचं आपण काही तरी देणं लागतो. समाजाच्या उन्नतीसाठी जगायचं असतं. त्यासाठी आपण मोठं व्हायचं असतं, ही ज्ञान प्रबोधिनीची शिकवण आहे. त्या दृष्टीने आम्ही आता सक्षम झालो आहोत. इथून पुढे या कामाला मोठा न्याय देण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल असेल, असे देवळेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.