Nigdi : चोरीची वाहने स्क्रॅप करणारे भंगार व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर
दोन भंगार व्यावसायिकांसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – शहरातून मोठ्या प्रमाणात (Nigdi) वाहने चोरीला जात असून त्यांचा शोध लागत नसल्याने हैराण झालेल्या पोलिसांनी आता आपले लक्ष भंगार व्यवसायिकांकडे केंद्रित केले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने निगडीमधील दोन भंगार व्यवसायिकांना अटक केली. त्याचबरोबर त्यांना वाहने विकणाऱ्या सराईत आरोपीस आणि चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या एकास देखील पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अकरा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे (वय 33, रा. अजंठानगर चिंचवड), रशीद मन्सूर शेख (वय 34, रा. निगडी), अन्वर शफी शेख (वय 43, रा. निगडी), मयूर सुखदेव हराळ (वय 34, रा. अजंठानगर चिंचवड. मूळ रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाहन चोरीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार ओटास्कीम निगडी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सुधीर कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने निगडी परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी सुधीर कांबळे हा पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातून आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. यामध्ये निगडी, दिघी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण 11 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दोन लाख 90 हजार रुपये किमतीच्या सात (Nigdi) दुचाकी जप्त केल्या. तर आरोपी सुधीर याने पाच दुचाकी वाहने रशीद आणि अन्वर या दोन भंगार व्यावसायिकांना दिली असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी रशीद आणि अन्वर या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी पाच दुचाकी वाहने कटरच्या साह्याने कापून त्याची भंगरात विक्री केल्याचे समोर आले. तसेच या आरोपींकडून मयूर हराळ याने दोन दुचाकी विकत घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला देखील पोलिसांनी अटक केली.
आरोपी सुधीर कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध जबरी चोरी घरपोडी वाहन चोरी असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत.
PCMC: मशाल यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेची स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंबलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांच्या पथकाने केली.