Nigdi: कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुपीनगर नव्हे तर सेक्टर 22 ओटास्कीम परिसर ‘सील’

कोरोनाबाधितांची एकूण संख्या 61, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या - 45

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अकराव्या दिवशी कोरोना रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. काल (शनिवारी) एकाच दिवशी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण संभाजीनगर, निगडी ओटास्कीम, यमुनानगर दवाखाना परिसर, चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे चऱ्होली, निगडी ओटास्कीम – यमुनानगर दवाखाना परिसर काल मध्यरात्रीपासून सील केला आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 45 वर पोहचली आहे.  आजपर्यंत शहरातील 61 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

महापालिकेच्या वतीने रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी प्राप्त झालेल्या प्रेसनोटमध्ये रुपीनगर परिसर सील करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर रात्री 10 वाजून 39 मिनिटांनी प्राप्त झालेल्या सुधारीत प्रेसनोटमध्ये रुपीनगर ऐवजी यमुनानगर ओटास्कीम – यमुनानगर दवाखान्याच्या आसपासचा परिसर असा विशिष्ट भागाचा उल्लेख करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज एकाचदिवशी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलासह  35, 38 आणि 21 वय वर्ष असलेले चार पुरुष रुग्ण आहेत. तर, 10 वर्षाच्या मुलीसह 30 आणि 62 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाला आहे. एकाच दिवशी सात रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण निगडी ओटास्कीम (यमुनानगर दवाखान्याच्या आसपासचा परिसर), संभाजीनगर, च-होली परिसरातील आहेत. त्यामुळे निगडी ओटास्कीम (यमुनानगर दवाखान्याच्या आसपासचा परिसर), च-होली हा परिसर काल रात्री 11 वाजल्यापासून सील केला आहे. संभाजीनगर भाग यापूर्वीच सील केला आहे. सील केलेल्या भागात पुढील आदेशापर्यंत प्रवेश आणि नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी आहे. या भागातील नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कालचा वैद्यकीय अहवाल !

# दाखल झालेले संशयित रुग्ण – 85

# पॉझिटीव्ह रुग्ण – 07

#निगेटीव्ह रुग्ण – 91

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 85

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 119

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 94

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 61

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 45

#वायसीएममध्ये 38 तर पुण्यात सहा, परभणीत एका रुग्णावर उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  1

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 15

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 13373

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 41924

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.