Nigdi : शाहीर जगला तर महाराष्ट्र जगेल – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – शाहीर जगला तर महाराष्ट्र जगेल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी निगडी येथे व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथे मनोहर सभागृहात महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून तीन दिवसीय भव्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर समारंभाचे उद्घाटक होते. एन.एस.जी.कमांडो आफिसर जगदीश देसले, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, स्वागताध्यक्ष भीमा बोबडे उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, “शाहिरी स्फूर्तिगान, कीर्तिगान, गौरवगान आहे. शाहिरी परंपरेत सर्व जाती-धर्माचे शाहीर आढळतात. विद्वान हे बेईमान असतात; पण शाहीर हे एकनिष्ठ आहेत. विद्वान हा संस्कृतीची वजाबाकी करतो; तर शाहीर तिची बेरीज करतो. आजकाल महापुरुषांची जातीनिहाय वाटणी केली जाते; परंतु शाहीर सर्व जातींना एकत्र जोडतो आणि सर्व महापुरुषांना वंदन करतो. अनेक प्रकारच्या अवहेलना, उपेक्षा सहन करीत शाहीर आणि लोककलावंत समाजासाठी जगले म्हणून शाहीर आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचे खरेखुरे संचित आहे. शाहिरांनी कधीही जातीय विष समाजात पेरले नाही, याचा बोध इतिहासकारांनी घ्यायला हवा. शासनाने शाहीर निर्माण होण्यासाठी शिक्षणसंस्था स्थापन कराव्यात” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “लोककला हे चालते बोलते विद्यापीठ असल्याने दीडशे वर्षे राज्य करूनही ब्रिटिश आपली संस्कृती नष्ट करू शकले नाहीत” शाहीर दादा पासलकर यांनी शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी दृढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ‘लोककला व ललितकला : सामाजिक उपक्रम’ या विषयावर डॉ. विश्वास मोरे यांना आणि ‘पोवाडा – राष्ट्र चैतन्यगीत’ या विषयावर डॉ. गंगाधर रासगे यांना पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी लोककला आविष्कार या सत्रात शाहीर श्रीकांत रेणके आणि सहकारी यांनी गोंधळ या लोककलेचे विविध आविष्कार सादर करीत संबळ जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. युवा शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांनी पोवाडा आणि कवने सादर करून रसिकांकडून वन्स मोअर मिळवला. शाहीर सावता फुले आणि सहकारी यांचे बहुरूपी भारुड श्रोत्यांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेले.

लोककला आविष्कार या सत्रापूर्वी ढोल, ताशा, डफ, ढोलकी, संबळ, हलगी, दिमडी अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पालखीत घालून स्वातंत्र्यवीर सावरकर सदन ते ज्ञानप्रबोधिनी शाळा अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ असा जयघोष करीत डोक्याला फेटा आणि मराठामोळा पेहराव करून बाल, युवा, महिला शाहीर आणि महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सर्व पदाधिकारी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर सुवासिनींनी पंचारती ओवाळून पालखीचे स्वागत केले.

बाळासाहेब काळजे, काशिनाथ दीक्षित, दीपक कुलकर्णी, सुजीत भोसले, प्रचिती भिष्णुरकर, वनिता मोहिते, कांचन जोशी, स्मिता बांदिवडेकर, शोभा जोशी, लीना देशपांडे, सुरेश सूर्यवंशी, अशोक कामथे, राजेंद्र आहेर, भालचंद्र हिवराळे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश ढवळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.