Nigdi: अखंडीत वीज पुरवठ्यासाठी शर्मिला बाबर यांचे महावितरणला निवेदन

Nigdi: Sharmila Babar's statement to MSEDCL for uninterrupted power supply निगडी प्राधिकरण भागात पाच-सहा महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

एमपीसी न्यूज- निगडी प्राधिकरण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी गुरुवारी (दि.11) महावितरण प्राधिकरण उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले आहे.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अनुप मोरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहरउपाध्यक्ष राजेंद्र बाबर, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शिनकर, माजी महापौर आरएस कुमार उपस्थित होते.

शर्मिला बाबर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, निगडी प्राधिकरण भागात पाच-सहा महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

यासाठी महावितरण कार्यालयात किंवा कनिष्ठ अभियंता यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, संबंधित अधिकारी फोन उचलत नाहीत आणि उचललाच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही.

लॉकडाउनमुळे अनेक तरुण-तरुणी घरातूनच कार्यालयीन कामकाज करीत आहेत. सकाळच्या वेळी गृहिणींची घरगुती कामांची धांदल असते. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या कामांचा बोजवारा उडतो शिवाय पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळित होते.

बाबर पुढे म्हणाल्या, वीज कोणत्या वेळी अखंडपणे उपलब्ध होणार आहे यासंबंधी महावितरण कार्यालयातून निश्चित माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या उद्रेकाचे समाधानकारक निराकरण करता येत नाही.

यामुळे नागरिकांसमवेत जाऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांची समक्ष भेट घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे.

यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी लॉकडाउनमुळे मनुष्यबळ कमी आहे, दुरुस्तीसाठी आवश्यक त्या साधन-सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे विलंब लागतो आणि दूरध्वनी नादुरुस्त असल्याने नागरिकांना कार्यालयाशी संपर्क साधता येत नसल्याच्या अडचणी सांगत आपली बाजू मांडली.

यावेळी नागरिकांच्या वतीने नारायण पांडे, मयूर भिंगारे, जयंत अहिरराव, पांडुरंग मोहिते, मधुकर पाटील, हनुमंत जाधव, मधुकर कोल्हे, विशाखा बुरटे यांनी तीव्र शब्दांत आपल्या तक्रारी मांडल्या असता एक आठवड्याच्या कालावधीत अडचणींचा निपटारा करून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल अशी हमी चौधरी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.