Nigdi : संवेदनशीलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो – श्रावण हर्डीकर

'समाजभूषण पुरस्कारा'ने हर्डीकरांचा गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची एका महानगरात वाटचाल होत आहे. देशातील सर्वात वेगाने वाढणा-या या शहराचा नियोजनबद्ध विकास आयुक्त या नात्याने आपण करणार आहोत. सामाजिक संवेदनशीलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो, असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. तसेच अनेकवेळा काही प्रलोभने देखील समोर येत असतात. अशा वेळी संताचे विचारच आपल्याला तारतात, असेही ते म्हणाले.

निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते हा समाजभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी देव महाराज, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह शरद इनामदार, संस्थेचे सचिव शामकांत देशमुख, मानसिंग साळुंखे, अमिता किराड, डॉ. प्रवीण चौधरी, राजीव कुटे, डॉ. अतुल फाटक यावेळी उपस्थित होते.

आयुक्त पदावर असताना अनेकवेळा अनावश्‍यक, अयोग्य अपेक्षा ठेवणा-या माणसांना नाही म्हणवे लागते. अशा घटनांमुळे नकारात्मकता येऊ शकते. अनेकवेळा काही प्रलोभने देखील समोर येत असतात; मात्र अशा वेळी संताचे विचारच आपल्याला तारतात असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, “लहानपण डोबिंवली येथे गेल्याने नागरिकरण कसे होऊ नये आणि विकास कसा व्हायला हवा याची जाणीव आहे. सामाजिक संवेदनशीलता जपत काही बदल केल्यास नियोजनबद्ध विकास होऊ शकतो. लहानपणापासून आई-वडील आणि गुरुजनांनी दिलेली शिकवण आणि सामाजिक संवेदनशीलता यामुळेच मी प्रशासकीय सेवेत आलो आहे”

मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या या पुरस्काराने मला शहरासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे. लोकसेवेचे घेतलेले व्रत कायमस्वरूपी जपण्यासाठी हा पुरस्कार शक्ती आणि प्रेरणादायी असल्याचे हर्डीकर म्हणाले.

शरद इनामदार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता नाईकरे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी शिवाजी अंबिके, विवेक धडफळे ,गंगाधर सोनवणे, गंगाधर वाघमारे, दिलीप गुंड, कैलास माळी, मधुकर रासकर यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका गौरी सावंत, तृप्ती वंजारे, सतीश गवळी, पांडुरंग मराडे, संगीता घुले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.