Nigdi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता बंद केल्याने सहा जणांना मारहाण; 11 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तरुणाने परिसरातील रस्ता बंद केला. या कारणावरून 11 जणांनी मिळून तरुणासह सहा जणांना मारहाण केली. ही घटना भिम शक्ती चौक निगडी येथे शनिवारी (दि. 25) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.

संपत घागरमळे, दिलीप दगळगे, अभिजित मांजरे, सुनील कांबळे, अक्षय वावळे, अशोक वावळे, आकाश वावळे, अजय वावळे, ऋतिक मांजरे, रवी साठे, रवी अवचार (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित रामदास साठे (वय 24) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 24) दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा आतेभाऊ अजय साळवे या दोघांनी मिळून परिसरात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्याने परिसरातील रस्ता बंद केला. या कारणावरून आरोपी संपत, दिलीप, अभिजीत, सुनील, ऋतिक या पाच जणांनी मिळून फिर्यादी यांच्या सोबत वाद घातला.

तसेच शनिवारी सायंकाळी सर्व आरोपींनी शुक्रवारच्या भांडणाच्या रागातून एकत्रित जमाव जमवून तलवार, कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण केली. फिर्यादी, त्यांची आत्या, आत्याचा मुलगा, फिर्यादीची आई, भावाची बायको आणि शेजारी असे सहा जणांना आरोपींनी मारहाण केली. फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.