Nigdi : आधारकार्ड नसल्याचे सांगितल्याने चौघांना मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचा-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – शेकोटी करून बसलेल्या चार जणांना राज्य उत्पादन शुल्कच्या एका कर्मचा-याने आधारकार्ड विचारले. ते नसल्याचे सांगितल्याने चौघांना काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 डिसेंबर 2019 रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली. याबाबत गुरुवारी (दि. 9) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ गणपत पौळ (वय 55, मिलींदनगर, ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश जाधव (वय 42) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयात कर्मचारी आहे. फिर्यादी पौळ हे त्यांचे मित्र दादा चव्हाण, कुमार गजानन खडसे, दादा भानुदास गायकवाड यांच्यासोबत ओटास्कीम येथे शेकोटी करून बसले होते. त्यावेळी आरोपी जाधव तेथे आला. त्याने फिर्यादी यांना आधारकार्डबाबत विचारले. आमच्याकडे आधारकार्ड नसल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी जाधव याने फिर्यादी व चव्हाण, खडसे व गायकवाड यांना लाकडी काठीने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुरुवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.