Nigdi : बाबूजी, गदिमा, पुलंच्या आठवणींनी रंगली स्वरसागर महोत्सवाची संध्याकाळ

एमपीसी न्यूज – यंदाचे वर्ष हे ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचेच औचित्य साधत त्यांच्या आठवणी जागविणा-या ‘शब्द सुरांचे सोबती’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले होते.

शुक्रवारी (दि. १) महोत्सवाच्या दुस-या दिवसाचा समारोप ‘शब्द सुरांचे सोबती’ या कार्यक्रमाने झाला. यामध्ये सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके, गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत व स्नुषा दीपा देशपांडे यांचा ‘शब्द सुरांचे सोबती’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या सर्वांनी या त्रयींचे अनेक किस्से उपस्थितांना सांगितले.

यावेळी बोलताना जयंत देशपांडे म्हणाले, “भाईकाका हे जसे घराबाहेर होते तसेच ते घरातही असायचे. म्हणजे घरीही ते सरळ उत्तर द्यायचे नाहीत. त्यांना आपल्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट आपल्या मित्रांना कधी सांगतो असे व्हायचे. त्यांनी किस्से ऐकवून जसे पैसे कमावले तसे ते सढळ हाताने अनेकांना मदतही करायचे.’’ याबरोबरच भाईकाका आणि काकींचे ड्रायव्हिंगचे किस्से, कोल्हापुरी चप्पलचे किस्से सांगत पुलंच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

यानंतर श्रीधर फडके आणि आनंद माडगुळकर यांनी बाबूजी आणि गदिमा यांची काही गीते सादर केली. यामध्ये ‘देव देव्हा-यात नाही, देव नाही देव्हा-यात…’, ‘सखी मंद झाल्या तारका…’ ‘विठ्ठला तू वेडा कुंभार…’ —- या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आनंद माडगुळकर व सुकन्या जोशी यांनी यावेळी कार्यक्रमाचे निरुपण केले .

त्यांना यावेळी तुषार आंग्रे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्ये), निलेश देशपांडे (बासरी), प्रणव कुलकर्णी (सिंथेसायजर), शिल्पा पुणतांबेकर व शेफाली साकोरीकर (गायन) यांनी त्यांना साथसंगत केली. यावेळी महोत्सवाचे मुख्य सल्लागार महेश काळे, सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, शरयू फाउंडेशनचे नितीन ढमाले, अभिजित भालेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.