Nigdi : शाळा सुटण्याच्या दहा मिनिटे अगोदर झाड पडले अन् अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – निगडी येथे एका शाळेसमोर झाड पडल्याची घटना घडली. हे झाड शाळा सुटण्याच्या दहा मिनिटे अगोदर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथे विद्यानंद भवन हायस्कूल ही शाळा आहे. शाळा दररोज दुपारी तीन वाजता सुटते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावरून सैरावैरा घराकडे धाव घेतात. रात्रीपासून पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मंगळवारी पहाटे विजेच्या गडगडाटात जोराचा पाऊस पडला. या पावसामुळे विद्यानंद भवन हायस्कूल समोरील एक जंगली झाड पडले.

दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर दहा मिनिटांनी शाळा सुटली. शाळा सुटण्यापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली नाही. परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ झाड तोडून बाजूला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.