Nigdi : आकुर्डीत सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज – रावण टोळीच्या म्होरक्याचा भाऊ असलेल्या सराईत गुन्हेगाराचा गॅरेजमधील साहित्याने निर्घृणपणे मारून भरदिवसा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी साडे पाचच्या सुमारास आकुर्डी पोस्ट ऑफिससमोर घडली.

अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय 26, रा. जाधव वस्ती, रावेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोन्या हा सराईत गुन्हेगार होता. सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा भाऊ होता. त्याच्यावर दरोड्याच्या प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. सोन्या आणि त्याचे मित्र आकुर्डी पोस्ट ऑफिससमोर असलेल्या एका गॅरेजजवळ दारू पीत बसला होता. दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाला. त्यातूनच सोन्याच्या मित्रांनी सोन्याच्या डोक्यात गॅरेजमधील साहित्याने डोक्यात मारले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तिथेच सोडून त्याचे आरोपी मित्र पसार झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथके रवाना केली आहेत.

संबंधित बातमी वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.