Nigdi : रसिकांनी अनुभवली शब्दरत्नांची श्रीमंती

स्वरसायली प्रस्तुत ‘वेचू शब्दरत्ने’ कार्यक्रमाचे आयोजन 

एमपीसी   न्यूज – ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’, ‘राधे तुला पुसतो घोंगडीवाला’, ‘मानस मानसा कधी व्हशिल मानूस’, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’, ‘माजो लवतोय डावा डोला’ या आणि इतर लोकप्रिय अन् मनाचा ठाव घेणाऱ्या भावभावनांचा शब्दरुपीपट रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते ते मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ‘स्वरसायली’ प्रस्तुत जनसामान्यातील असामान्य प्रतिभावान अशा कवयत्रींच्या कविता, गीतरुपी ‘वेचू शब्दरत्ने’ या अनोख्या कार्यक्रमाचे.
गुढीपाडव्यानिमित्त स्वरांगण रसिक योजनेचे पहिले पुष्प रविवारी सायंकाळी ज्ञान प्रबोधिनीच्या मनोहर वाढोकार सभागृहात गुंफण्यात आले. जनसामान्यातील असामान्य चारचौघी म्हणजे संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत आणि शांता शेळके. यांच्यासह त्यांच्या समकालीन कवयत्रींच्या रचना आणि गाणी सादर करण्यात आली. सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्री, सारेगमपफेम सायली राजहंस-सांभारे, सारेगमपफेम सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी यांनी सादर केलेली गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. निवेदनाची बाजू सांभाळली ती सुप्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे यांनी. उत्तरोत्तर रंगत गेलेला हा सोहळा रसिकांना शब्दरत्नांची श्रीमंती देऊन गेला.
  • ‘चाफ्याच्या झाडा’, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’, ‘नयन तुजसाठी आतुरले’, ‘बरं काग आई हे विसरायचं नाही’, ‘काटा रुते कुणाला’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘रेशमाच्या रेघांनी’ या गीतांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. ‘वैकुंठिच्या राया’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

ऋचा पाटील, गार्गी भाटे, रुपाली पाथरे यांनी कवितांचे नाट्यरूपी सादरीकरण केले. संगीत संयोजन अनय गाडगीळ यांचे होते. तर मंदार गोडसे (संवादिनी), विनीत तिकोनकर (तबला), रोहन वनगे (ऑक्टोपॅड), धनंजय साळुंके (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. दिग्दर्शन मकरंद कुलकर्णी आणि सहदिग्दर्शन देवेंद्र भिडे यांनी केले.
  • शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ, सवाई गंधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. राजेंद्र कंदलगावकर, साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष कवी राजन लाखे, मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिया, प्रमुख कार्यवाह यशवंत लिमये यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कर्नल अनुप बरबरे, शिवराज पिंपुडे, सचिन पटवर्धन, वा. ना. अभ्यंकर यांच्या हस्ते मातृभूमीच्या प्रतिमेचे पूजन झाले.
सुरांच्या गुढीचे पूजन अमित गावडे आणि तृष्णा गावडे यांच्या हस्ते झाले.  स्वागत डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, दीपाली टोणगावकर, सचिन चपळगावकर,  रुपाली चपळगावकर, नाट्य परिषदेचे कार्यवाह सुहास जोशी, पुणे नाट्य परिषदेच्या संचालिका शोभा कुलकर्णी यांनी स्वागत आणि सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका भिडे यांनी केले तर मातृ मंदिर विश्वस्त संस्थेचे श्रीकृष्ण अभ्यंकर यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.