Nigdi : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांकडे मिळाले साडेपाच लाखांचे घबाड

चौकशीत हा ऐवज अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे आणि याबाबत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. : The two violators of the curfew got Rs 5.5 lakh

एमपीसी न्यूज – संचारबंदीची अंमलबजावणी करत असताना पकडलेल्या दोघांकडे पोलिसांना 5 लाख 60 हजार रुपयांचे चोरी आणि फसवणुकीचे घबाड मिळाले आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा ऐवज अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे आणि याबाबत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोहमद अली रईस शेख (वय 24, रा. नागरेचाळ, अहमदनगर), दानीश हुसेन उमर शेख (वय 23, रा. कस्तुरी चौक, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस भक्ती शक्ती चौक, निगडी परिसरात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गस्त घालीत होते. त्यावेळी पोलिसांना दोघेजण संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे आढळले.

त्यावरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद आणि दानीश या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली.

दरम्यान, पोलिसांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली आणि त्यांची झडती घेतली.

त्यात पोलिसांना 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा आयफोन, 1लाख 25 हजार रुपयांची सोन्याची साखळी, 1 लाख 10 हजारांची हिरव्या रंगाचा पना खडा असलेली चांदीची अंगठी, 50 हजार रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे मनगटी घडयाळ, 60 हजार रुपये रोख रक्कम, 65 हजारांचा आयफोन असा एकूण 5 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज मिळाला.

त्याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी हा ऐवज अहमदनगर येथून चोरून आणल्याचे सांगितले. याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.