Nigdi: गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – रूपीनगर परिसरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने प्रभाग क्रमांक 13 मधील  निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 1 ते रविवार दि. 3 मे दरम्यान येथे कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी घेतला आहे. या बंद मध्ये फक्त रूग्णालये, औषध विक्रीची दुकाने खुली राहणार आहेत.

रूपीनगरमध्ये कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. यामुळे शेजारील निगडी प्रभागातील चारही नगरसेवकांनी एकत्रित येत आपल्या प्रभागात कडकडीत बंदचा निर्णय घेतला आहे. रुपीनगर हा शेजारील प्रभाग असल्याने कोणताही उशिर न करता प्रतिबंधकात्मक निर्णय घेण्यात आला. निगडी प्रभागातील नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी महापालिका प्रशासनासोबत व निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार बंदचा निर्णय घेतला.

यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, ओटास्कीम परिसरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे यांनी केले आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. बंदचे पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.