Nigdi : तीन महिलांनी कार चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – लिफ्टच्या बहाण्याने कारला थांबवून तीन महिलांनी चालकाला ब्लेडचा धाक दाखवून लुटले. चालकाकडील 95 हजारांचा ऐवज महिलांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील कृष्णा हॉटेल समोर घडली.

गणेश नानासाहेब देशमुख (वय 49, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी गणेश त्याच्या कार (एम एच 15 / बी एक्स 5262) मधून घरी जात होते. ते प्राधिकरण येथील कृष्णा हॉटेलसमोर आले असता तीन अनोळखी महिलांनी त्यांना लिफ्ट मागितली. गणेश यांनी कार थांबवून तिन्ही महिलांना लिफ्ट दिली. कारमध्ये बसल्यानंतर आरोपी महिलांनी गणेश यांना ब्लेडचा धाक दाखवला. गणेश यांच्याकडील 41 ग्रॅमची सोन्याची चेन, दोन अंगठ्या आणि रोख रक्कम असा एकूण 95 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.