Nigdi : शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोन भावांना मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळीचा जाब विचारल्याने दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 17) सायंकाळी थरमॅक्‍स चौक येथे घडली.

संजय मुरलीधर साळुंके (वय 34, रा. काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष चव्हाण (वय 28, रा. आदर्शनगर, काळेवाडी) व त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास फिर्यादी साळुंके हे आपल्या भावाच्या गॅरेजमध्ये उभे होते. त्यावेळी आरोपी आणि त्याचा साथीदार तिथे आला. ‘तुझी लई नाटके चालू आहेत,’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावर ‘तू शिवीगाळ का करतो’, अशी विचारणा साळुंके यांनी केली असता आरोपीसोबत असलेल्या साथीदाराने साळुंके यांना पकडले.

त्यावेळी आरोपी चव्हाण याने गॅरेजमधील रॉड घेऊन साळुंके यांच्या डोक्‍यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी साळुंके यांचा भाऊ आला असता आरोपीने हातोडीने त्यांनाही मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.