Nigdi : भक्ती-शक्ती ते मुकाई चौक दरम्यानच्या बंद बीआरटी मार्गात दुचाकीस्वार सुसाट

हद्दीच्या अडचणींमुळे पोलिसांची दमछाक; दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौकाकडे जाणारा बीआरटी मार्ग दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापासुन पुढे बंद केला आहे. या बंद मार्गावर दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात वाहने चालवतात. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. मागील काही दिवसात या भागात भरधाव वेगात दुचाकी चालवणे काही तरुणांना चांगलेच भोवले आहे. या रस्त्यावर पोलीस ठाण्यांच्या हद्दीची अडचण असल्यामुळे पोलिसांची अशा प्रकारांवर लक्ष देण्यासाठी दमछाक होत आहे.

भक्ती शक्ती चौकाकडून मुकाई चौकाकडे जाणा-या बीआरटी मार्गाचे काम सुरु आहे. हा रस्ता दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापासुन पुढे वाहतुकीसाठी बंद केला आहे. पुढे रेल्वे मार्गावरील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे दुर्गा टेकडी चौकापासून मुकाई चौकाकडे काही अंतरावर हा रस्ता तयार आहे. या रस्त्यावर नागरिक सकाळी, सायंकाळी शतपावली, व्यायाम करण्यासाठी जातात. तरुण-तरुणींचा गप्पा मारण्याचा पॉईंट म्हणून या रस्त्याची ओळख तयार झाली आहे.

  • याच रस्त्यावर काही उनाड मुले वाहनांचे स्टंट आणि रेस करतात. आजूबाजूने नागरिक येत-जात असताना बीआरटी मार्गातून ही रेस किंवा स्टंटबाजी केली जाते. यामध्ये पादचारी नागरिक रस्त्यात येण्याची शक्यता असते. तसेच दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याचाही धोका आहे. मागील काही दिवसांमध्ये या भागात स्टंटबाजी करणा-या काही तरुणांना चांगलेच भोवले आहे.

निगडीमधील ज्ञानप्रबोधिनी शाळेचा माजी विद्यार्थी प्रज्वल म्हसे याचा या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी निगडीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार झाले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रज्वल हा दुचाकीवर मागे बसला होता. तर, त्याचा मित्र दुचाकी चालवत होता. घरच्यांचा लाडका असलेल्या प्रज्वलला अपघातामुळे जीव गमवावा लागला. अशाच प्रकारचा आणखी एक अपघात या रस्त्यावर झाला. त्यातही एका तरुणाचा मृत्यू झाला.

  • या मार्गावर गस्त घालण्यासाठी पोलिसांची दमछाक होते. हा परिसर निगडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. तरीही या परिसराला रावेत पोलीस चौकीशी जोडून दिले आहे. रावेत पोलिसांना इथे पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, निगडी पोलीस काही क्षणात इथे पोहोचू शकतात. दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापर्यंत निगडी पोलिसांची हद्द आहे. त्यानंतर रावेत पोलिसांची हद्द सुरु होते. बंद रस्त्याचा भाग रावेत पोलीस चौकीच्या हद्दीत येतो. त्यामुळे या रस्त्यासह प्राधिकरण सेक्टर 26 मधील काही भाग निगडी पोलीस ठाण्यास जोडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हीच अडचण चिंचवड स्टेशन चौकात येते. पुणे-मुंबई महामार्गाच्या एका बाजूला पिंपरी पोलीस स्टेशन तर दुस-या बाजूला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला दवा बाजार आहे. इथे दररोज हजारो नागरिकांचा राबता असतो. अनेक दुकाने, कार्यालये या भागात आहेत. हा परिसरात निगडी पोलिसांच्या हद्दीत येतो. पिंपरी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरचा भाग निगडी पोलीस ठाण्यात येतो. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुस-या बाजूला एखादी घटना घडल्यास नागरिक तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतात. पण, पिंपरी पोलिसांकडून निगडी पोलिसांकडे जाण्यास सांगितले जाते. पोलिसांना काम करण्याची इच्छा नाही, केवळ टोलवाटोलवी करण्यात पोलीस पटाईत आहेत, अशी भावना यामुळे नागरिकांची होते. हद्दीच्या अडचणींमुळे नागरिक आणि पोलीस दोघांचीही दमछाक होते.

  • याबाबत नगरसेवक अमित गावडे म्हणाले, “हा परिसर निगडी पोलीस ठाण्यास जोडून देण्याबाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना निवेदन दिले आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.”

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले, “दुर्गा टेकडी चौकापासून पुढे रावेत पोलीस चौकीची हद्द सुरु होते. हद्द इतर पोलीस ठाण्याची असली तरीही परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निगडी पोलीस बंद बीआरटी रस्त्यावर देखील काही वेळेला गस्त घालतात. तरीही पोलिसांची नजर चुकवून काही तरुण स्टंटबाजी करत असतील. त्यावर लक्ष ठेऊन असा काही प्रकार आढळल्यास संबंधित पोलिसांशी संपर्क करून मदत करण्यात येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.