Nigdi: पेटीएम अकाउंट अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची पावणे पाच लाखांची फसवणूक

Nigdi: Under the pretext of updating Paytm account, a businessman robbed of rs 5 lakh आरोपी मोबाइल धारकाने फिर्यादी यांना फोन करून त्यांचा पेटीएम कालावधी संपला असल्याचे सांगितले. तसेच पेटीएम अपडेट करण्याचा सल्ला दिला.

एमपीसी न्यूज- पेटीएम अकाउंट अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची चार लाख 88 हजार 865 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याबाबत एका मोबाइल धारकासह पेटीएम, नियरबाय कंपनी, क्विकसिल्वर, अ‍ॅमेझॉन इंडिया, मोबिविक कंपनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भेळ चौक, प्राधिकरण निगडी येथे घडली आहे.

संजय कानमल जैन (वय 44, रा. भेळ चौक, प्राधिकरण) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9145496589 या मोबाइल धारकाविरोधात तसेच पेटीएम, नियरबाय कंपनी, क्विकसिल्वर, अ‍ॅमेझॉन इंडिया, मोबिविक कंपनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 19 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास भेळ चौक प्राधिकरण निगडी येथे ऑनलाइन घडला आहे. फिर्यादी जैन यांचे खेळणी विक्रीचा व्यवसाय आहे.

आरोपी मोबाइल धारकाने फिर्यादी यांना फोन करून त्यांचा पेटीएम कालावधी संपला असल्याचे सांगितले. तसेच पेटीएम अपडेट करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर आरोपी मोबाईल धारकाने फिर्यादी यांचे पेटीएम अकाउंट डिलीट करण्यास लावले. फिर्यादी यांच्या एसबीआय बँक, ॲक्सिस बँक, पेटीएम यावरून ऑनलाइन माध्यमातून चार लाख 88 हजार 865 रुपये स्वतःकडे ट्रान्सफर करून घेतले.

त्यानंतर ते पैसे आरोपीने पेटीएम, नियरबाय कंपनी, क्विकसिल्वर, ॲमेझॉन इंडिया, मोबिविक कंपनी आदींना ट्रान्सफर केले.

हे पैसे फसवणूक करून ट्रान्सफर केले असल्याचे संबंधित कंपन्यांना फिर्यादी यांनी मेल करून सांगितले असता कंपन्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मोबाइल धारकासह कंपन्यांविरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.