Nigdi : खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – मागील काही महिन्यांपासून खून व जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाने निगडी येथील ओटास्किम येथे ही कारवाई केली.

सुनील पोपट गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार,  खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी आशिष बोटके आणि निशांत काळे यांना माहिती मिळाली की, पिंपरी येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार सुनील गायकवाड हा मित्राला भेटण्यासाठी निगडीतील ओटास्किम परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी ओटास्कीम परिसरात सापळा रचून गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिंपरीच्या गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी येथे खुनाचा आणि देहूरोड पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी आणि निगडीत लूटमार केल्याच्या गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, कर्मचारी गणेश हजारे, निशांत काळे, आशिष बोटक, प्रवीण कांबळे, आशिष बनकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.