Nigdi : ‘शिवसेना नगरसेवकासोबत का फिरतो’, असे म्हणत माजी उपमहापौरांच्या मुलाकडून कार्यकर्त्याला अर्वाच्य शिवीगाळ, मारण्याची धमकी

Why Shiv Sena walks with corporator', former Deputy mayor's son insults activist, threatens to kill him

एमपीसी न्यूज – पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणा-या भाजपच्या युवा मोर्चाचे माजी प्रदेश चिटणीस, राज्य माथाडी महामंडळाचे माजी सल्लागार सदस्य अनुप मोरे यांच्या मुजोरीची घटना समोर आली आहे. ‘शिवसेना नगरसेवकासोबत का फिरतो’, असे म्हणत एका कार्यकर्त्याला फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. भरचौकात मारण्याची धमकी दिली. 

‘पालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे यांच्यासोबत फिरायचे नाही’, अशी दमबाजी केली. निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी असताना आत्तापासूनच मोरे यांच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी मोरे यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दमबाजी झालेल्या संबंधित कार्यकर्त्याने याबाबत निगडी पोलिसात  तक्रार दिली आहे.  त्यानुसार अनुप मोरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे अनुप हे चिरंजीव आहेत. ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या तोंडून अशी भाषा आल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ची टिमकी मिरवणाऱ्या भाजपची काळी बाजू समोर आली आहे.

प्राधिकरण सारख्या उच्चभ्रू आणि शांत परिसरात असा प्रकार होणे हे अशोभनीय आहे , अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

“फोनची सुरुवातच अवार्च्य शिवीगाळ करत सुरु केली. राजकारणात मी माफ करणार नाही. बापासमोर चौकात हाणणार आहे. दररोज मारील. यापुढे अमित गावडे सोबत दिसला नाही पाहिजे. आमच्यासोबत राहायचं तर इमानदारीत राहायचं. त्याच्यासोबत राहिचयं तर नुकसान पण सहन कराचयं. नुकसानच करणार, सोडणार नाही.

त्यामुळे शेवटचे सांगतो. त्याच्यासोबत दिसला तर तुला त्रास होणार. तिथं दिसला तर उचलून नेईन, भर चौकात मारेल. हात पाय तोडीन. पालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे सोबत दिसला तर याद राख, माझ्या ऐवढे वाईट कोण नाही. मागच्या वेळी काय झालं होतं ते तुला माहिती आहे. शेवटची वॉर्निंग”, अशा प्रकारची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे.

याप्रकरणी मोरे यांच्यावर निगडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणा-या,  पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या माजी पदाधिका-यांच्या मुलाच्या तोंडात दमबाजीची भाषा शोभत नाही.  पालिकेच्या निवडणूकीसाठी अजून दीडवर्षाचा कालावधी शिल्लक आहे.

असे असताना आतापासूनच दमदाटी, दादागीरी करून वर्चस्व निर्माण करुन कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.