Nigdi : प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल करणे चुकीचे – नीता परदेशी

विमेन हेल्पलाईनच्या वतीने निगडी पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गावाहिनी प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी मुलींवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गावाहिनी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून मुली स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. असे विमेन हेल्पलाईन पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी सांगितले.

विमेन हेल्पलाईनच्या वतीने याबाबत निगडी पोलिसांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दुर्गावाहिनी या शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशिक्षणार्थी मुलींची निगडी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुलीच्या हातामध्ये प्रात्यक्षिकासाठी हत्यारे देण्यात आली होती. यावरून पोलिसांनी आयोजकांसह मुलींवर देखील गुन्हा दाखल केला आहे. प्रशिक्षणार्थी मुलींचा यामध्ये काहीही दोष नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

नीता परदेशी म्हणाल्या, “संपूर्ण भारतात बेटी बचाओ, बेटी पढाओ हे महिला सशक्तीकरणासाठी अभियान राबवले जात आहे. महिलांवर, मुलींवर अत्याचार झाले तर त्याला योग्य प्रतिसाद देण्यासाठी त्या सक्षम असायला हव्यात. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेने दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षणार्थी मुलींची निगडी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेसाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही. तरी देखील निगडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह पोलीस कर्मचारी शोभायात्रेत होते. शोभायात्रेसोबत पोलीस देखील चालले. पोलीस शोभायात्रेसाठी हजर राहतात. शोभायात्रेसोबत चालतात आणि गुन्हेही दाखल करतात. अशी पोलिसांनी दुटप्पी भूमिका बजावली आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचेही परदेशी म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.