Nigdi: भक्ती-शक्ती पुलाचे काम अंतिम टप्प्यात; 15 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचे नियोजन, मात्र…

Nigdi: Work on Bhakti-Shakti bridge in final phase, planned to open by August 15 मुंबईकडून पुण्याकडे येणारा आणि पुण्याहून मुंबईकडे जाणा-या पुलाचे काम 10 टक्के बाकी आहे. त्यामुळे हा पूल चालू करता येवू शकेल.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम सुरु आहे. त्यातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील भाग 15 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन सुरु आहे. या उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा त्रास मोठ्याप्रमाणात वाचणार आहे. दरम्यान, पुलाच्या कामाची निर्धारित मुदत 26 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आली होती. निर्धारित मुदत संपून तब्बल दहा महिने झाले. तरीही, पुलाचे काम पूर्ण झाले नाही.

मुंबईहून पुण्याकडे येताना शहराचे प्रवेशद्वार म्हणून भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान चौकाची ओळख आहे. या चौकात चारही बाजूने शहरातील तसेच, बाहेरील अवजड वाहने सातत्याने ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी पालिकेने चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याचे काम बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला दिले.

दि. 27 जून 2017 रोजी कंपनीने कामाला सुरुवात केली. या कामासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. कामाची निर्धारित मुदत 26 डिसेंबर 2019 रोजी संपली आहे. त्यामुळे या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर तब्बल दहा महिने उलटून गेले. तरीही काम पूर्ण झाले नाही.

पुलाच्या कामासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांना लांबून वळसा घालावा लागत आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या नागरिकांना पीएमपीएल बस डेपोला वळसा घालून यावे लागते.

तर, मुंबईहून पुण्याकडे येणा-या नागरिकांना अंकुश चौकातून वळसा घालून जावे लागत आहेत. त्यात नागरिकांचा वेळ जात आहे. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे आणि मुंबईहून पुण्याकडे येण्याचा मार्ग 15 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

याबाबत बोलताना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”भक्ती-शक्ती पुलावरील पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने येण्याचा मार्ग 15 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, होऊ शकेल असे सांगू शकणार नाही. कारण, डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे. पाऊस आला तर ते काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही”.

”पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामासाठी काही दिवस लागतील. मुंबईकडे उतरणा-या रॅम्पवरील डांबर राहिले आहे. पावसामुळे डांबरीकरणाचे काम होईल की नाही याबाबत शंका आहे”, असे सह शहर अभियंता श्रीकांत सवने यांनी सांगितले.

”मुंबईकडून पुण्याकडे येणारा आणि पुण्याहून मुंबईकडे जाणा-या पुलाचे काम 10 टक्के बाकी आहे. त्यामुळे हा पूल चालू करता येवू शकेल. डांबरीकरण करुन पूल चालू करण्याचे नियोजन आहे. वाहतुकीकरिता पूल तात्पुरत्या स्वरुपात चालू करता येईल” असे उपअभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.