Pune : एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात नायजेरियन युवकास सापळा रचून अटक

सायबर पोलिसांची कारवाई; एटीएममधून पैसे काढताना नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणात एका नायजेरियन युवकास सायबर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून क्लोनिंग करण्यासाठीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

जॉन मायकल अन्ड्र्यू असे अटक केलेल्या नायजेरियन युवकाचे नाव आहे.

सायबर पोलिसांना पिसोळी येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करण्याचे डिव्हाईस लावले आहे, अशी माहिती मिळाली. त्यामाहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी आरोपी जॉन याला क्लोनिंग डिव्हाईसमधील माहिती काढून घेण्याकरिता आला असता सापळा रचून अटक केली.

त्याच्याकडून एक हिरव्या रंगाचे एटीएम मशीनमध्ये कार्ड इन्सर्ट करण्याचे स्लॉट वरील कव्हर सारखा त्याच्या मागील बाजूस इलेक्ट्रीक सर्किट आणि एक लाल रंगाचा बर्हिवक्र चौकोनी पॅनल त्याच्या मागीला बाजूस इलेक्ट्रॉनिक सर्किट व 16 जीबीचे मेमरी कार्ड मिळून आले. हे सर्व साहित्या पोलिसांनी जप्त केले असून त्याची चौकशी केली असता त्याने पुण्यात राहण्याचे कारण व अन्य माहिती दिली नाही.

याप्रकरणी आरोपी जॉनवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना एटीएममधून पैसे काढताना एटीएममध्ये क्लोनिंग अथवा स्किमर सारखे डिव्हाईस लावले आहे का याची खात्री करून घ्यावी. तसेच एटीएमचा पिन नंबर टाकताना कीपॅड हाताने झाकून पिन कोणालाही दिसणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.