Night Curfew Pune : नाईट कर्फ्यू लागू असला तरी पुण्यातील व्यवहार मात्र सुरळीत !

एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत 22 डिसेंबरच्या (मंगळवारी) मध्यरात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. परंतु पुण्यातील दिवसभरातील सर्व व्यवहार सुरळीत राहणार असूून सकाळी सहानंतर रात्री 11 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी असतील. परंतु, संचारबंदीच्या काळात मध्यरात्री विनाकारण गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

युरोप आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा जीवघेणा विषाणू सापडला असून त्याचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

या अनुषंगाने शहरनिहाय आदेश उद्या दुपारपर्यंत निघेल त्यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांवर कोणत्या मर्यादा येणार हेही स्पष्ट केले जाईल. संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबतचा पुणे महापालिकेचा आदेश मंगळवारी (22 डिसेंबर) दुपारी निघू शकतो, असेही सांगण्यात आले.

पुण्यासह विविध शहरात गेल्या काही दिवसांपूस कोरोनाची साथ कमी होत असल्याचे आकडे येत आहेत. पुण्यातही आता दुसऱ्या लाटेची शक्यता नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे, अशा परिस्थितीत ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणु सापडल्याने सर्वत्र पुन्हा प्रचंड भीती पसरली आहे.

राज्यात नाईट कर्फ्यू लागू केल्यानंतर मात्र दिवसभरातील व्यवहारांवर त्याचा परिणाम होणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे शहरात संचारबंदीच्या काळात नेमके काय सुरू राहील आणि काय बंद राहणार, कोणत्या कामांसाठी लोकांना घराबाहेर येता येईल, याची स्पष्टता उद्याच्या आदेशात नमूद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.