Nigdi: ‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील नागरिकांना ग्रीन झोनमधील ‘पीसीसीओई’त क्वारंटाईन करण्यास नगरसेवकांचा विरोध; नगरसेवकांनी रात्र काढली रस्त्यावर

Night vigil by Nigdi Pradhikaran corporators at PCCOE college opposing the decision to make PCCOE college as quarantine facility for HotSpot Anandnagar citizens.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. काल 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्याच परिसरातच क्वारंटाईन करावे.

आमच्या ग्रीनझोन मध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भिती निगडी प्राधिकरण येथील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करत नगरसेवकांनी चक्क रात्र रस्त्यावर काढली.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे.

आजपर्यंत निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी दक्षता घेत हा प्रभाग कोरोनामुक्त ठेवला आहे. प्रभाग ग्रीनझोन आहे.

त्यामुळे या ठिकाणी हॉटस्पॉट मधील नागरिकांना ठेवणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांनी क्वारंटाईन सेंटरला विरोध केला आहे.

शनिवारी (दि. 23) सकाळपासून त्यांनी तिथे ठिय्या मांडला होता, त्यानंतर रात्रीही नगरसेवकांनी चक्क रस्त्यावरच मुक्काम ठोकला. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे.

झोपडपट्टीतील 60 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

प्रशासन आनंदनगरमधील 500 नागरिकांना ‘पीसीसीओई’तील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवणार आहे. त्याची कोणालाही पुर्वकल्पना न देता 14 नागरिकांना शुक्रवारी रात्री आणून ठेवले आहे.

त्यातील काही पॉझिटीव्ह रुग्ण आल्यावर त्यापासून निगडीतील नागरिकांना धोका होवू शकतो. त्या नागरिकांना आनंदनगर परिसर, त्या प्रभागातील शाळेतच क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. ग्रीनझोनमध्ये क्वारंटाईन करणे चुकीचे आहे. त्याला आमचा विरोध असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

क्वारंटाईन सेंटरला ज्या-ज्या सुविधा, बॅरिकेट्स करायचे आहे. त्याची दक्षता घेतली जाईल. प्रशासनाच्या निर्णयाला कोणीही विरोध करू नये, असे महापालिका आयुक्तांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.