Pune News: निलेश घायवळ टोळीचा मोक्कातील गुंड गजाआड

एमपीसी न्यूज: निलेश घायवळ टोळीतील मोक्का कारवाईतील सराईत गुंडांला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तुषार उर्फ रावण सुरेश पोळेकर (वय 23) असे या गुंडाचे नाव आहे. कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गुन्हा पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. तेव्हापासून तो फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना तुषार हा कात्रज स्मशानभूमी समोरील पुलाखाली थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कोथरूड येथील एका गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे.

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 60 हुन अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर आतापर्यंत मोका नुसार कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.