Nilu Phule remembered : तुझी माणुसकीची शिकवण कधीही विसरणार नाही…

Your teachings of humanity will never be forgotten

एमपीसी न्यूज – ज्यांना लौकिक अर्थाने मनोरंजन क्षेत्रात लागतो तसा देखणा चेहरा नाही, भरदार शरीरयष्टी नाही, पाठीमागे कोणी गॉडफादर नाही. तरीदेखील फक्त आपल्या अभिनयाच्या आणि नजरेच्या जोरावर ज्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली ते मराठी व हिंदी नाट्यचित्र कलाकार म्हणजे निळू फुले. आजही त्यांनी रंगवलेला बेरकी सरपंच, मस्तवाल खलनायक व इरसाल राजकारणी आपण विसरु शकत नाही. बाई वाड्यावर या म्हटले की लगेच निळू फुलेच आठवतात.

बरोबर ११ वर्षांपूर्वी म्हणजे १३ जुलै २००९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. निळू फुले यांची मुलगी व अभिनेत्री गार्गी फुले- थत्ते यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली.

 

‘बाबा… आज तुला जाऊन ११ वर्षे झाली. शरीराने लांब कुठेतरी गेलास पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील आणि सतत सांगत राहशील की, नन्या बाकी कशीही रहा, कुठेही रहा पण समाजाचं आपण देणं लागतो हे विसरु नकोस. डोंट वरी बाबा, तू दिलेली माणुसकीची ही शिकवण मी कधीही विसरणार नाही.. आय लव्ह यू बाबा’, अशा शब्दात गार्गी यांनी भावना व्यक्त केल्या.

खरंतर आजही निळू फुले पडद्यावर आल्या की प्रेक्षकांकडून त्यांच्या पडद्यावरच्या कृष्णकृत्यांना शिव्यांची लाखोली मिळते. ही त्यांच्या अभिनयाला मिळालेली दादच असते. अभिनयाबरोबरच त्यांनी सेवादलाचे काम पण केले. एक जबाबदार नागरिक या नात्याने त्यांनी अनेक समाजोपयोगी गोष्टी केल्या. ज्यावेळी कोणतीही अनुकूल स्थिती नव्हती त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलीला माणुसकी जपण्याची शिकवण दिली.

सध्या गार्गी ‘राजारानीची ग जोडी’ या कलर्स वाहिनीच्या मालिकेत मावशीचे काम करत आहेत. त्याआधी त्यांनी ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.