Pune News : स्थानिकांचा विरोध असूनही नऊ मीटर रस्त्यांला मंजुरी ?

एमपीसी न्यूज : स्थायी समितीमधील भाजपच्या एका सदस्याच्या आग्रहखातर कोथरुड मधील सर्व्ह नंबर १४ आणि १५ म्हणजे संगम प्रेस रस्त्यानजीक कर्वे नगरकडे वळणारा सहा मीटरचा रस्ता नऊ मीटर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मुळात स्थानिक रहिवाश्यांनी मागणी नसताना रस्तारुंदीकरण करू नका, असे लेखी पत्र दिले असताना देखील रस्तारुंदीकरण करण्याला मंजुरी दिल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. 

करिश्मा सोसायटी समोरून कर्वेनगरला वळणारा रस्ता सहा मीटरचा आहे. त्यामुळे डीपीमध्ये हा रस्ता असल्यामुळे लगतच्या सोसायट्यांना पुणे महापालिकेकडून बांधकाम परवानगी त्या रस्त्याच्या अनुषंगाने दिली गेली होती. परंतु आता 9 मीटर रस्तारुंदीकरण केल्यास लगतच्या 6 ते 8 सोसायट्यांची सीमाभिंत, पार्किंगच्या जागा रस्त्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी लेखी पत्र देत आमची मागणी नसताना रस्तारुंदीकरण करु नये अई विनवणी केली आहे.

परंतु केवळ काही मुठभर बांधकाम विकसकांचे ‘अर्थपूर्ण हित’ जपण्यासाठी रस्तारुंदीकरणाचा निर्णय लादला जात असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. दरम्यान या आठवड्यातील स्थायी समिती बैठकीत सहा मीटरचा रस्ता नऊ मीटर करण्याची तत्परता दाखवली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील सहा मीटरचे रस्ते नउ मीटर करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीने यापुर्वीच घेतला आहे. तरीही या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास स्थानिक रहिवाशी आणि संबंधित सोसायटीमधील नागरिकांचा विरोध आहे. तरीही सहा मीटरचा रस्ता नउ मीटर करण्याची ‘कार्य तत्परता’ स्थायी समितीने दाखविली.

हा विषयही एकमताने दाखल मान्य करण्यात आला. एकीकडे शहर, उपनगरामध्ये अनधिकृत बांधकामे, रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले गेले असताना त्याविरोधात कारवाई करण्याऐवजी रीतसर परवानगी घेतलेल्या अधिकृत सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवर काही माननीयांची वाकडी नजर पडली आहे. त्याला स्थायी समिती, महापालिका प्रशासन संगनमताने रस्तारुंदीकरणाचे षडयंत्र करत असल्याचा आरोप काही स्वयंसेवी संस्थांनी केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.