-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nisarga Cyclone Live Updates: चक्रीवादळ उरणपर्यंत पोहचले, मुंबईच्या दिशेने प्रवास, अलिबागमध्ये निसर्गाचा रुद्रावतार

Nisarga Cyclone Live Updates: Nisarga cyclone will hit near Alibag at around 1 pm

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील दिवेआगार, श्रीवर्धन, अलिबाग या पट्ट्यात दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास कोकणच्या किनारपट्टीला धडकले आहे. चक्रीवादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीच्या अगदी जवळ असून पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत, असे हवामान खात्याने म्हटले आहे. चक्री वादळाने रुद्रावतार धारण केला असून ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून मुसळधार पाऊस सुरू झाल्याचे वृत्त आहे. चक्रीवादळ उरण, ठाणे व मुंबईच्या दिशेने सरकत आहे. मुंबईत ताशी 72 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहेत. 

आता मुंबईपासून 90 किलोमीटर तर अलिबागपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असून आज (बुधवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दिवेआगार, श्रीवर्धन, अलिबाग या पट्ट्यात धडकले, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटरचा आहे. अलिबाग, पनवेल, नाशिक, धुळे असा चक्रीवादळाच्या पुढील प्रवासाची दिशा असणार आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी आणि कमांडंट एस. गावडे यांनी आकाशवाणीला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 30 हजार लोकांना बाहेर काढले आहे.

अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. कित्येक घरांवरील व इमारतींवरील पत्रे उडून गेल्याच्या बातम्या हाती येत आहेत. विजेचे खांब वाकले आहेत, पडले आहेत, विजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे बहुतेक भागातील  वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चक्री वादळाचा बाह्य भाग वॉल कोणत्याही क्षणी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. श्रीवर्धनला वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला आहे.  चक्रीवादळाचा केंद्र बिंदू (आय)  अजून लांब असला तरी चक्रीवादळ किनाऱ्याकडे सरकण्याचा वेग वाढत आहे. चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येईल, तसा वाऱ्यांचा वेग कमालीचा वाढण्याची शक्यता आहे.

  • अलिबागमध्ये ताशी 80 किलोमीटरपर्यंत वाढलाय वाऱ्यांचा वेग
  • समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात
  • मुंबई, कोकण व गोव्यात पावसाला सुरूवात
  • रत्नागिरीत 60 ते 70 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहात आहेत. 
  • मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
  • चक्रीवादळाचा धोका असलेल्या किनारपट्टीवर हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
  • महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 20 टीम मदतकार्यासाठी तैनात
  • एनडीआरएफ पथक संख्या – मुंबईत आठ, रायगड जिल्ह्यात पाच. पालघर, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक. 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn