Nisarga Cyclone Update: कोरोनापाठोपाठ आलेल्या आपत्तीमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत

Nisarga Cyclone Update: Disaster in Corona disrupts life in Konkan

एमपीसी न्यूज- तीन दिवसांपूर्वी झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्याला बसला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील गावांनाही मोठा फटका बसला असून मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन गावात अजूनही फोन सुरू नसल्याने संपर्क होऊ शकत नाही.

या भागातील बऱ्याच गावांची संपर्क यंत्रणा सुरू नसल्याने अजूनही नीट संपर्क होऊ शकत नाही. मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी जनजीवन पूर्वपदावर येण्यास पुढील किमान 15 दिवस लागण्याची शक्यता आहे.

निसर्ग वादळामुळे आंजर्ले, दापोली, मुरुड आणि आजूबाजूच्या गावाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावातील सर्व घरांचे, बागायातीचे प्रचंड नुकसान झाले आहे. वित्तहानी मोठी झाली आहे.

कित्येक झाडे घरावर आणि रस्त्यावर उन्मळून पडली असून रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. वीज वितरणच्या वायरी आणि खांब उखडून पडले आहेत. घरावरील पत्रे, कौले उडून गेली आहेत.

या कठीण परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. तसेच मदतीसाठी NDRF च्या तुकडया कार्यरत आहेत. क्रेनच्या सहाय्याने रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे.

बहुतेकांच्या घरांचे आणि त्यामागील वाड्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात गुडघाभर पाणी साठल्यामुळे धान्याची नासाडी झाली आहे. घरावरील छतच उडून गेल्याने गावातील मंदिरात एकत्रित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. संपर्क तुटल्यामुळे मदत कार्य सुरु होण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

गावातील संपुर्ण जनता भयभीत आहे. वीज नाही, पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. घरांची डागडुजी करणे खूपच कठीण होऊन बसले आहे. गावांतील वीज येण्यासाठी पुढील 15 दिवस तरी लागण्याची शक्यता आहे.

नारळ आणि सुपारी या उत्पन्नाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून हे पूर्वपदावर येण्यास कमीतकमी पुढील 4 वर्षे लागू शकतात असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि नागरिकांना मदत करावी अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.