Niwar cyclone News : निवार चक्रीवादळाची तीव्रता मंदावल्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता !

एमपीसी न्यूज : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले. त्याचा वेग ताशी 11 कि.मी. इतका होता. आज (दि.27) या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसनी घटणार असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

चक्रीवादळाचा वेग कमी झाला असला, तरी ते गुरुवारी दुपारी पुद्दुचेरीपासून वायव्येकडे 50 किलोमीटर अंतरावर होते. सायंकाळनंतर त्याचा वेग आणखी कमी होता. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील काही भागांवर झाला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत हवामान ढगाळ होते. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण भागांत थंड वारे वाहिल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली होती. गुरुवारी निफाड येथे 12.5 अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली.

निवार चक्रीवादळ गुरुवारी कर्नाटकाच्या किनारपट्टीवर आल्यानंतर या भागात पाऊस सुरू झाला होता. किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील बहुतांशी भागांत पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांचे व झांडाचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान, निवार वादळीप्रणालीच्या प्रभावामुळे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.