Pimpri news: महापालिका कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड, 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान  मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. दरम्यान, आयुक्त सानुग्रह अनुदान देण्यास अनुत्सुक होते. पण, चर्चेअंती आयुक्तांनी त्यास मान्यता दिली.

महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके आणि कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. या वेतन कराराचे हे अंतिम वर्ष आहे. कोरोना कालावधीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानावर गंडांतर येण्याची चिन्हे होती. बोनसची हक्काची रक्कम देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता होती. तथापि, सानुग्रह अनुदान देण्यास त्यांची तयारी नव्हती. या पार्श्वभूमीवर  महापौर उषा ढोरे आणि सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिका-यांसह महापालिका आयुक्तांची गुरुवारी (दि.29) भेट घेतली. सानुग्रह अनुदान आणि 8.33  टक्के बोनस एक रकमी द्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली. चर्चेअंती आयुक्तांनी त्यास मान्यता दिली.

दिवाळीपूर्वी कर्मचा-यांना सानुग्रह आणि बोनस देण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे यांना दिले. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, कोरोना कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत कर्मचा-यांनी काम केले आहे. महापालिकेचे उत्पन्न घटले असे आयुक्तांचे म्हणणे असले तरी पुढील तीन ते चार महिन्यांत उत्पन्न वाढीसाठी महापालिका कर्मचारी संपूर्ण योगदान देतील.

दरम्यान, महापालिका कर्मचा-यांना एक स्थानिक सुटी मिळून यंदाच्या दिवाळीत चार दिवस सुटी मिळणार आहे. 13 ते 16 नोव्हेंबर असा सुटीचा कालावधी असेल. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विभागीय आयुक्तांनी यंदा तीन ऑगस्ट, एक सप्टेंबर आणि 17 ऑक्टोबर, अशा तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या होत्या. मात्र, 17 ऑक्टोबर घटस्थापनेचा दिवस शनिवार होता. पाच दिवसांच्या कामकाज आठवड्यामुळे शनिवारी (दि. 17) कार्यालयीन सुटी होती. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी 17 ऑक्टोबरची स्थानिक सुटी 13 नोव्हेंबरला जाहीर केली. या दिवशी धनत्रयोदशी आहे. 14 नोव्हेंबरला शनिवार, लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी आहे. 15 रोजी रविवार आहे आणि 16 नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याची शासकीय सुटी आहे. याच दिवशी भाऊबीजही आहे. धनत्रयोदशी आणि भाऊबीजेला सुटी नसते. यंदा दोन्ही सणांना सुटी मिळणार असल्याने कर्मचारी, अधिका-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.