Pimpri News: नेहरुनगर येथील ‘जम्बो’ सेंटरच्या ठेकेदाराला महापालिका पावणेदोन कोटी देणार

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो कोरोना रूग्णालयाचे कामकाज पाहणा-या ठेकेदाराला एक महिन्यासाठी 1 कोटी 88 लाख रूपये देण्यात येणार आहेत.

जुलै 2020 मध्ये कोरोना प्रादूर्भाव वाढला असता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात जम्बो कोरोना रूग्णालय उभारण्यात आले. पीएमआरडीए कडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रसिद्ध करण्यात आला होता.

यामध्ये जेस आयडीया प्रायव्हेट लिमिटेड यांना कामकाज करण्यासाठी आदेश दिले होते. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीमध्ये फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी यांची 22 मार्च 2021 रोजी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात 200 बेडचे जंबो कोरोना रूग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरू करण्याकरिता आदेश दिले आहेत. या रूग्णालयात 100 बेड ऑक्सिजन युक्त, 50 आयसीयू, 50 एचडीयू या प्रमाणे करण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. पीएमआरडीएने पूर्वीच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे कामकाज करण्याबाबत कळविण्यात आले.

पुणे महापालिकेने दिपाली डिझाईन्स अ‍ॅण्ड एक्झिबीटस प्रायव्हेट लिमिटेड यांना 20 मार्च 2021  रोजीच्या आदेशानुसार 1 कोटी 60 लाख रूपये अधिक 18 टक्के जीएसटी याप्रमाणे एक महिन्यासाठी 1 कोटी 88 लाख रूपये दर ठरविण्यात आला.

त्याच दराने जेस आयडीया यांना 1 मार्च 2021 ते 31 मे 2021 या कालावधीपर्यंत आदेश देणे आवश्यक होते. परंतु, 28 मार्च रोजी जेस आयडीया यांच्यासमवेत प्रती दिन प्रती बेड 2 हजार 395 रूपये 83  पैसे असा दर ठरविला होता. त्यानुसार 200  बेडसाठी 3 कोटी 77 लाख रूपये देण्यात आले होते.

मात्र, पीएमआरडीएने 1 कोटी 60 लाख रूपये अधिक 18 टक्के जीएसटी असा दर निश्चित केला आहे. त्यामुळे जेस आयडीया यांना पूर्वी दिलेले आदेश रद्द करण्यात येऊन 5 कोटी 66 लाख 40 हजार रूपयांचे आदेश देण्यात आले आहेत. दोन महिन्यांसाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार रूपये या खर्चास स्थायी समितीने 31 मार्च 2021 रोजी मान्यता दिली आहे. उर्वरीत 1 कोटी 88 लाख 80 हजार रूपये जेस आयडीया यांना देण्यात येणार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.