Pimpri : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल तक्रार निवारण समितीकडे वर्षभरात एकही तक्रार नाही

एमपीसी न्यूज – बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अधिकाराशी संबंधित तक्रार मांडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तक्रार निवारण समितीकडे एकही तक्रार आली नाही. कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचा दावा समितीने केला आहे. वर्षभरात एकही तक्रार न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चे कलम 32 नुसार(1) अन्वये या अधिनियमाखाली कोणत्याही  व्यक्तीला एखाद्या बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गा-हाणे अथवा तक्रार मांडावयाची असल्यास त्या व्यक्तीला त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करता येईल अशी तरतूद आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालकांच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गा-हाणे मांडावयाचे असल्यास महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात यासंबंधी तक्रार करता येण्याची सोय आहे.  त्यानुसार गेल्या वर्षी  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभाग तक्रार निवारण समिती तयार करण्यात आली होती.

एक वर्ष उलटूनदेखील या समितीची एकही बैठक झालेली नाही. तसेच आमच्याकडे एकही तक्रार न आल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रश्नच पडत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे आहेत तक्रार निवारण समितीचे सदस्य

पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या तक्रार निवारण समितीमध्ये सहाय्यक आयुक्त प्रविण आष्टीकर (अध्यक्ष), पराग मुंढे (सदस्य सचिव), डॉ. कमलादेवी आवटी(सदस्य), सोमा आंबवणे (सदस्य), बाळासाहेब राक्षे(सदस्य़), सौदागर शिंदे(सदस्य) यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.