Pimpri: नागरिक, ठेकेदारांना आणखी आठ दिवस पालिकेत ‘नो एंट्री’!

No entry for citizens, contractors for another eight days in pimpri-chinchwad municipal corporation पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून आजपर्यंत शहरातील 3377 जणांना लागण झाली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिक, ठेकेदार यांना आणखी आठ दिवस म्हणजेच आजपासून 10 जुलैपर्यंत पालिकेत ‘नो-एंट्री’ असणार आहे. या प्रवेशबंदीच्या मुदतवाढीचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज काढला आहे. नागरिकांनी पालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करावा. ते ग्राह्य धरुन प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

लॉकडाउनमध्ये नागरिकांना दोन महिने महापालिकेत प्रवेशबंद होता. परंतु, शिथिलतेनंतर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना 27 मे पासून दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेश दिला जात होता.

परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून आजपर्यंत शहरातील 3377 जणांना लागण झाली आहे.

कोरोनाने महापालिका मुख्यालयात देखील शिरकाव केला आहे. महापालिकेच्या 30 कर्मचा-यांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचा-यांना संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील कर भरणा विषयक कामकाज वगळता 10 जुलै 2020 पर्यंत महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्रवेशबंद असणार आहे.

नागरिक, ठेकेदारांसह इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार लॉकडाउनच्या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिक, ठेकेदारांनी महापालिका सेवेशी संबंधिक कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करावा.

या माध्यमांद्वारे प्राप्त अर्ज, निवेदने, तक्रारींबाबत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करुन त्याच माध्यमांद्वारे संबंधितास कळविण्यात यावे, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.