Talegaon News : ऐतिहासिक तळे परिसरातील वृक्षतोडीबद्दल नगरपरिषदेने सांगूनही पोलिसांकडून ‘नो एफआयआर, नो ॲक्शन’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक तळे परिसरात झालेल्या वृक्षतोडीबद्दल नगरपरिषद प्रशासनाने तळेगाव दाभाडे पोलिसांना पत्रव्यवहार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असताना देखील तळेगाव दाभाडे पोलिसांनी यावर एफआयआर नोंदवला नाही तसेच कोणती कारवाई देखील केली नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्याकडून माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली असता हे वास्तव उघड झाले आहे. सन 2017 साली ही वृक्षतोड झाली असून मागच्या पाच वर्षात यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच त्याबाबत कोणतेही कागदपत्रे, अर्ज पोलिसांकडे उपलब्ध नाहीत.

तळे परिसरात झालेल्या वृक्ष तोडीबद्दल नागरिकांनी व नगरपरिषदेने पोलीस निरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीचा अभिलेख पोलिसांकडे उपलब्ध नाही. 23 जून 2017 रोजी या वृक्षतोडीचा पंचनामा तयार केला. ज्यामध्ये नगरपरिषदेच्या परवानगी शिवाय वृक्षतोड झाल्याचे निश्चित झाले. त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत तत्कालीन मुख्याधिका-यांनी तळेगाव पोलिसांना पत्र दिले. मुख्याधिका-यांचे पत्र तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघावकर यांच्याकडे चौकशीसाठी दिले असल्याचे तळेगाव पोलिसांनी माहिती अधिकारात सांगितले. मात्र काय कारवाई केली याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्याधिका-यांनी पत्र दिल्यानंतर याबाबत प्रथम एफआयआर दाखल करणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी तो देखील केला नाही. न्यायालयात तपशील सादर करून पुढील कार्यवाही करण्याबाबत पोलिसांकडे माहिती नाही. तसेच त्याचे योग्य कारण देखील पोलिसांना देता आलेले नाही. पोलिसांनी या बाबतीत वन विभागाशी केलेले पत्र व्यवहार पोलिसांकडे उपलब्ध नाहीत.

या संपूर्ण प्रकरणामुळे या अवैध वृक्षतोडीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचे काम केले आहे का. मुख्याधिका-यांच्या आदेशाला पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे का. अवैध वृक्षतोड करणा-याना पोलीस पाठीशी घालत आहेत का, असे अनेक प्रश्न या माहितीतून उपस्थित होत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.