Nigdi News : इन-आउटचे नियोजन नाही; देहूरोडकडे जाणा-या वाहनचालकांना होत नाही भक्ती-शक्ती पुलाचा उपयोग

आकुर्डीपासून पुलावर जाण्यासाठी सोय (इन) नाही

एमपीसी न्यूज  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, इन-आउटचे कोणतेही नियोजन केले नाही. आकुर्डीपासून सेवा रस्त्याने जाणा-या वाहनचालकांना पुलावर जाण्यासाठी सोय (इन) नाही. त्यामुळे देहूरोडकडे जाणा-या वाहनचालकांना पुलाचा उपयोग होत नाही. यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली असून इनची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीच्या भक्ती – शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. उड्डाणपूल, रोटरी मार्ग बनविण्यात येत आहे. या कामामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारुन ये – जा करावी लागत होती. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे भक्ती-शक्ती पुलावरील पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने येण्याचा मार्ग वाहतुकीस खुले करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, इन-आउटचे कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे सेवा रस्त्याने आकुर्डीतून देहूरोडकडे जाणा-या वाहनचालकांना पुलाचा उपयोग होत नाही.

आकुर्डीतून सेवा रस्त्याने जाणा-या वाहनचालकाला भक्ती-शक्ती पुलावर जाण्यासाठी सोय (मर्ज इन) नाही. त्यामुळे वाहनचालकाला पुलाचा उपयोग होत नाही. पुल खुला होवूनही दोन अडीच किलोमीटरचा वळसा मारावाच लागतो. ग्रेडसेपरटरमधून आकुर्डीच्या पुढे तुळजाभवानी मंदिर, पवळे पुलाच्या सुरुवातीला आणि पुलाच्या शेवटी तीन ठिकाणी आउटची सोय आहे. पण, आकुर्डीपासून एकाही ठिकाणी इनची सोय नाही. त्यामुळे देहूरोडकडे जाणा-या वाहनचालकांना पुलाचा उपयोग होत नाही.

वाहतूक पोलिसांच्या सल्लाने इन-आउटचे नियोजन  करणार – भोजने

याबाबत बोलताना पालिकेचे प्रवक्ते, उपअभियंता विजय भोजने म्हणाले, ”प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू झाला नाही. अपघात टाळण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने येण्याचा मार्ग वाहतुकीस खुला केला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या सल्लाने मर्ज इन आणि मर्ज आटचे नियोजन करण्यात येईल. रोटरी चालू झाल्यावर अडचणी येणार नाहीत”.

वाहनचालक अरविंद डोंगरे म्हणाले, ”निगडीकडून देहूरोडकडे जाणा-या जुना पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने भक्ती शक्ती चौकात उड्डाण पूल बांधला. नागरिकांची सोय व्हावी म्हणून तो सुरुही केला. पण, आकुर्डी, निगडी भागातील नागरिकांना देहूरोडकडे जाण्यासाठी अजूनही वळसाच घालावा लागत आहे. कारण, आकुर्डी चौकापासून भक्ती- शक्ती चौकापर्यंत कुठेही मर्ज इन देण्यात आलेला नाही. पालिकेने याचे नियोजन करायला हवे. भक्ती- शक्ती चौकातील संपूर्ण उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोय केली जाईल, असे सांगितले जाते. मात्र तोपर्यंत आकुर्डी आणि निगडी परिसरातील वाहनचालकांना वळसाच घालावा लागतोय. पालिकेने या समस्येकडे लक्ष देऊन मर्ज इन साठी व्यवस्था करायला हवी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.