Pune News : तुम्ही कितीही माणसे पळवण्याचा प्रयत्न करा, शेवटी लोकांचे प्रेम मोदींवर; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाचे आपले प्लॅनिंग असते, उगाच ढोल वाजवायचे नसतात. दोन दिवसानंतर आम्हीही काय करतो ते बघा. तुम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये काय करू शकता याचे ढोल वाजवले. आम्हाला शांतपणे काम करण्याची सवय आहे. तुम्ही कितीही माणसे पळवण्याचा प्रयत्न करा शेवटी लोकांचं नरेंद्र मोदी वर प्रेम आहे. लोकांचे प्रेम नगरसेवकांवर नाही.

जाणाऱ्यांनी विचार करावा पुन्हा येण्याची वाट बंद आहे. संघटनेच्या ताकदीवर आणि नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वावर एका दिवसात 2 कोटी 60 लाख इतका लसीकरण झाला आहे. त्याचं कौतुक राहिला बाजूलाच. त्यामुळे जाणार्‍या नगरसेवकांनी बिनधास्त जावं. चंद्रकांत पाटील यांनी आज मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, काही लोकांना भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदींचे कर्तुत्व झेपतच नाही. आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी पंजाब मध्ये काय चाललय तिकडे लक्ष द्यावे. जहाज जेव्हा बुडत असतं तेव्हा कॅप्टनने सर्वात शेवटी बाहेर पडायचं असतं. कॅप्टन काँग्रेसमधून सर्वात शेवटी बाहेर पडले याचा अर्थ आता जहाज लवकरच बुडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.