Maval : मावळात भावनिक नाही तर विकासाच्या राजकारणाची गरज – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ गोळीबाराची घटना ही दुर्दैवी होती, पण तिचे केवळ भावनिक राजकारण करण्यात आले. गोळीबारातील हुतात्मा शेतकऱ्यांचे वारस व जखमींना अजूनही न्याय मिळाला नाही, ही दुःखद बाब आहे. त्यामुळे केवळ भावनिक राजकारण करण्याऐवजी तालुक्यात विकासाचे राजकारण होण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे सुनील शंकरराव शेळके यांनी व्यक्त केले. 

शेळके यांनी पवन मावळ दौऱ्यात येळसे येथे जाऊन पवना गोळीबारातील हुतात्म्यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब भेगडे, माऊली ठाकर  आदी उपस्थित होते.

शेळके म्हणाले की, भावनिक राजकारणातून कधीही विकास होत नाही. गोळीबारातील सर्व पीडितांना आपण यापूर्वीही शक्य होईल, तशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, पण त्यासाठी आपण कधीही भावनांचे राजकारण करणार नाही. मावळच्या विकासाला गती आणि योग्य दिशा देण्यासाठी आपण प्रयत्न करू.

बापूसाहेब भेगडे म्हणाले की, सुनीलआण्णांकडे कोणतेही पद नसताना त्यांनी स्वखर्चाने तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. शेकडो तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. सुनीलआण्णांकडे सत्ता आली तर ते निश्चितच तालुक्याचा कायापालट करून दाखवतील. म्हणूनच मावळच्या विकासासाठी आपण दोन पावले मागे येऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.